नाशिक - एचपीव्ही लसीकरण मोहिमेला सुरुवात
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाचा उपक्रम नाशिक, 24 मार्च (हिं.स.)। नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेस सु
HPV vaccination campaign


नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाचा उपक्रम

नाशिक, 24 मार्च (हिं.स.)। नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली असून, आत्तापर्यंत एकूण ८४ मुलींना लसीकरण करण्यात आले आहे.

महिलांच्या दीर्घकालीन आरोग्य सुरक्षिततेसाठी आणि समाजातील कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असल्याचे मत वैद्यकीय विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. भारत सरकारच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १४ वर्षाच्या मुली (ज्यांनी १४ वा वाढदिवस साजरा केला आहे पण १५ वर्षे पूर्ण झालेली नाहीत) या एचपीव्ही लसीसाठी पात्र आहेत; परंतु काही परिस्थितींमध्ये एचपीव्ही लसीकरण दिले जाणार नाही. यामध्ये १४ वर्षाच्या वयोगटाबाहेरील मुली, पूर्वी एचपीव्ही लस (गार्डासिल किंवा सर्वाव्हॅक) घेतलेली असल्यास, लस किंवा तिच्या घटकांमुळे अॅलर्जी असणाऱ्या तसेच गंभीर आजार असलेल्या मुलींना ही लस दिली जाणार नाही. अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्ती पूर्णपणे बरी झाल्यानंतरच लसीकरण करणे आवश्यक आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत एचपीव्ही लस मोफत दिली जात आहे. तसेच सर्व लाभार्थ्यांची नोंद यू-विन (यु विन) पोर्टलवरते करण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या १४ वर्षे वयोगटातील मुलींना नजिकच्या महापालिका शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर नेऊन मोफत एचपीव्ही लसीकरणाचा लाभ घ्यावा आणि कर्करोगमुक्त भविष्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, आयुक्त मनिषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, वैद्यकीय आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर, सहा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंके यांच्या वतीने तसेच वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande