लातूर - महावितरणची वीजबिल वसुली मोहीम आक्रमक; २४९७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
लातूर, 24 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील वीजबिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणने मार्च अखेरीस आक्रमक मोहीम सुरू केली असून थकबाकीदार ग्राहकांवर कडक कारवाई केली जात आहे. वारंवार सूचना देऊनही बिल न भरलेल्या २ हजार ४९७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आह
महावितरण


लातूर, 24 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील वीजबिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणने मार्च अखेरीस आक्रमक मोहीम सुरू केली असून थकबाकीदार ग्राहकांवर कडक कारवाई केली जात आहे. वारंवार सूचना देऊनही बिल न भरलेल्या २ हजार ४९७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच इतर वर्गवारीतील वीजग्राहकांकडे एकूण ९४ कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे. यात ३६ कोटी ३० लाख रुपयांची जुनी थकबाकी तर चालू महिन्याचे ५८ कोटी १६ लाख रुपये वसूल करायचे आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस अवघे सहा दिवस शिल्लक असल्याने वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी दारोदार जाऊन वीजबिल वसुली करत असून अनेक ग्राहकांनी तातडीने बिल भरून सहकार्य केले आहे. मात्र प्रतिसाद न देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा थेट मीटर काढून खंडित केला जात आहे. स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा स्वयंचलितपणे बंद होत असून, नॉन-स्मार्ट मीटर थेट काढून घेण्यात येत आहेत. थकबाकी भरल्यानंतरच पुन्हा वीजजोडणी करण्यात येत आहे.

गेल्या चोवीस दिवसांत लातूर मंडळात ४७ कोटी ७३ लाख रुपयांची वसुली झाली असली, तरी ती चालू बिलाच्या केवळ ८२ टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे. मागील थकबाकी अद्यापही मोठ्या प्रमाणात बाकी आहे. निलंगा विभागात ४ कोटी ८५ लाख थकबाकी असून चालू महिन्यातील ९ कोटी ४८ लाखांपैकी ८ कोटी २७ लाख वसुल झाले आहेत. उदगीर विभागात १७ कोटी २३ लाख थकबाकी असून १५ कोटी ९० लाखांपैकी १३ कोटी २८ लाख वसुली झाली आहे. लातूर विभागात १४ कोटी २१ लाख थकबाकी असून ३२ कोटी ७८ लाखांपैकी २६ कोटी १८ लाख वसूल करण्यात आले आहेत.

थकबाकीदारांनी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर परस्पर जोडणी केल्यास थेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही महावितरणने दिला आहे.

मुख्य अभियंत्यांचा आढावा

महावितरणचे लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी वसुली कामाचा सातत्याने आढावा घेतला असून कमी वसुली असलेल्या भागांना प्रत्यक्ष भेटी देत आहेत. अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी तसेच निलंगा, उदगीर व लातूर विभागातील कार्यकारी अभियंते आणि कर्मचारीही वसुलीसाठी सक्रिय झाले आहेत.

मार्च अखेरीस उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सर्व ग्राहकांनी थकीत व चालू वीजबिले भरून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande