
मुंबई , 24 मार्च (हिं.स.)।भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठकही बोलावली आहे. त्यामुळे चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता वाढली आहे.
महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातशी जवळचे संबंध असल्यामुळे रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपदही जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधिमंडळात अशोक खरात प्रकरणावर निवेदन करणार आहेत. तत्पूर्वी, सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीचे कारण व तपशील अद्याप बाहेर आला नाही. पण या बैठकीत अशोक खरात प्रकरणावर चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुनेत्रा पवारांनी देवगिरी बंगल्यावर प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांची बैठक घेतली होती. या बैठकीत रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाच्या होणाऱ्या बदनामीवर चर्चा झाली होती. या बैठकीनंतर पक्षश्रेष्ठींनी चाकणकरांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे सुनील तटकरे यांनी या बैठकीनंतर लगेचच या प्रकरणी कुणालाही पाठिशी घातले जाणार नसल्याचे सूचक विधान केले होते. तेव्हापासूनच चाकणकरांची महिला प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी केली जाईल अशी चर्चा रंगली होती.
दुसरीकडे, सुनेत्रा पवारांनी आज देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीतही या प्रकरणी धीरगंभीर चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेषतः रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद कुणाकडे सोपवायचे? याविषयी सुनेत्रा पवार आपल्या सहकारी आमदारांचे मत जाणून घेतील. यावेळी त्या आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना करणार असल्याचीही माहिती आहे.
रुपाली चाकणकर यांनी आज एका पोस्टद्वारे त्यांच्यावर जादूटोण्यासाठी अनामिक कापल्याचे होणारे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी त्यांनी धायरीच्या एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सदर अध्यक्ष चाकणकरांच्या अनामिकेला गाडीतून उतरताना दुखापत झाल्याचा दावा करताना दिसून येत आहे. चाकणकर याविषयी म्हणाल्या, गेली 20-22 वर्ष सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करताना, जसजसा प्रगतीचा आलेख वाढत गेला तसतशी चिखलफेक करणारी विकृती वाढत गेली. प्रत्येक वेळी संयमाने शांतपणाने टिका सहन केली. वैयक्तिक टिका करणे हे माझ्या रक्ताताच नाही. पण आता सगळ्या मर्यादा ओलांडून माझ्यासह कुटुंबाला जो त्रास दिला जातोय ते भयावह आहे.
ज्यांनी हा आयुष्याचा प्रवास जवळून पाहिला, ते सर्व संपर्क करून आम्ही सोबत आहोत हे आवर्जून सांगतात. त्या सर्वांचे आभार. खरात प्रकरणात मी पहिल्या दिवशीच भूमिका स्पष्ट केली आहे. तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व त्यानंतरही माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुराव्यासह स्पष्टीकरण दिले आहे. सत्य समोर येईलच. धायरीकर तुमचे मनापासून धन्यवाद, असे त्यांनी म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode