संस्कृत विश्वविद्यालय रत्नागिरी उपकेंद्राचे रूपांतर विस्तृत परिसरात व्हावे - डॉ. अतुल वैद्य
रत्नागिरी, 24 मार्च, (हिं. स.) : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे रूपांतर विस्तृत परिसरात व्हावे, अशी अपेक्षा प्रभारी कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी केले. भारतरत्न डॉ. काणे र
कुलगुरूंचे स्वागत करताना संचालक प्रा दिनकर मराठे


रत्नागिरी, 24 मार्च, (हिं. स.) : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे रूपांतर विस्तृत परिसरात व्हावे, अशी अपेक्षा प्रभारी कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी केले.

भारतरत्न डॉ. काणे रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राला मंगळवारी भेट दिल्यानंतर ते बोलत होते. डॉ. वैद्य यांचे स्वागत व सत्कार उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांना केला. डॉ. वैद्य यांनी उपकेंद्राची पाहणी केली, वर्गखोल्या, नव्याने बांधलेले नाट्यगृह, कार्यालयीन कामकाज, अभ्यासिका यांची पाहणी केली व नवनवीन प्रस्ताव देण्यास डॉ. काणे उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांना सांगितले.

ते म्हणाले, कार्यभार स्वीकारल्यानंतर आज रत्नागिरी उपकेंद्राला प्रथमच धावती भेट दिली. उपकेंद्राचे काम सुरवातीपासून अतिशय उत्तम रितीने सुरू आहे. उपकेंद्राला लवकरच पाच वर्षे पूर्ण होणार असून शून्यातून सुरू झालेला हा प्रवास आता पुढच्या टप्प्यावर पोहोचला आहे. आता पुढच्या पाच वर्षांत या उपकेंद्राचे परिसरात रूपांतर व्हावे. पंचवार्षिक योजनांचा आराखडा आखण्यात येत आहे. भारतीय ज्ञान परंपरा याच्यावर भर असला पाहिजे. पुढील पाच वर्षांचा आराखडा बनवला जाणार आहे. त्यामध्ये संस्कृतच्या पारंपरिक अभ्यासक्रमासोबत भारतीय ज्ञान परंपरा व दर्शनशास्त्र, वेद, उपनिषदे सोप्या भाषेत सामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत, याकरिता प्रकल्प केले जातील. या सर्वाचा वैज्ञानिक ऊहापोह व्हायला हवा. भारतरत्न डॉ. पां. वा. काणे यांचे विशेष दालन सुरू करण्यासाठी प्रयत्न आहे. संस्कृतचे नियमित विषय, नाट्यशास्त्र, साहित्य, व्याकरण अभ्यासक्रम चालू राहतील. दर्शनशास्त्र, वेद किंवा उपनिषद या सर्व गोष्टींचा वैज्ञानिक ऊहापोह व्हावा. समाजापुढे उपनिषद, दर्शनाला मोक्षाचा मार्ग म्हणून पाहिले जाते, ते योग्य आहे. परंतु या दर्शनशास्त्राचा मूळ उद्देश सृष्टीला समजून घेणे, सृष्टीचा उगम कसा झाला हा आहे. आधुनिक भाषेत बोलायचे तर दर्शनाचे वजन किंवा आकारमान वा ऊर्जा कोणत्या स्वरूपाची आहे त्याची क्षमता याचा ऊहापोह व्हावा. त्यामुळे या दर्शनशास्त्रांकडे वेगळ्या पद्धतीने पाहिले पाहिजे. त्याचे वेगवेगळे प्रकल्प व्हावेत. उपकेंद्राची व्याप्ती कमी असली तरी परिसर या रूपाने नावारूपाला यावे. रत्नागिरीत संस्कृतज्ञ, अभ्यासक होऊन गेले आहेत. आता नव्या पिढीसाठी भारतीय ज्ञान परंपरेचा सोप्या भाषेत प्रसार व्हावा. याकरिता उपकेंद्राने योगदान द्यावे.

यावेळी कुलगुरू डॉ अतुल वैद्य यांनी उपकेंद्रातील कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान या विषयावरील प्रदर्शनाला भेट दिली. त्याचप्रमाणे उपकेंद्राची प्रकाशने व इंटरडिसिप्लिनरी रिसर्च इन धर्मशास्त्र या पूर्ण झालेल्या प्रकल्पाचे कार्य जवळून पाहिले. शिवाय उपकेंद्रातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योग भवनाला भेट देऊन तेथे सुधारणांच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.

डॉ. वैद्य यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. काणे संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे हे लवकरच आराखडा बनवून देणार आहेत. त्यानंतर विद्यापीठाकडून प्रशासकीय, आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करू. भारतीय ज्ञान परंपरेला विज्ञानाच्या माध्यमातून पुढे आणण्यासाठी विश्वविद्यालय कार्यरत राहील. येणाऱ्या अनेक पिढ्यांना यावेसे वाटेल, शिकावेसे वाटेल. याकरिता उपकेंद्राचे संचालक व सर्व कर्मचाऱ्यांना सदिच्छा देतो.

या वेळी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, निरी संस्थेतील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. महेंद्र पाटील, रत्नागिरीतील विविध संस्थांचे व संलग्नित महाविद्यालयांचे पदाधिकारी, विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande