
लातूर, 24 मार्च, (हिं.स.)। जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे विशेष जनजागृती कार्यक्रम आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 'क्षयमुक्ती'चा निर्धार करत या कार्यक्रमाद्वारे जिल्ह्यात १०० दिवसीय विशेष क्षयरोग शोध मोहिमेला सुरुवात झाली.
कार्यक्रमाची सुरुवात महान शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. जिल्हा क्षयरोग अधिकारी श्रीमती डॉ. एस.एन. तांबारे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या भाषणात क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, यावर प्रकाश टाकला.
जनजागृती रॅली आणि पथनाट्य
मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. ही रॅली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपासून महात्मा गांधी चौकापर्यंत काढण्यात आली व पुन्हा त्याच ठिकाणी समारोप झाला. य्वेली बाभळगाव येथील नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी क्षयरोग विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बाभळगाव नर्सिंग कॉलेज, न्यू व्हिजन, महाराष्ट्र नर्सिंग कॉलेज, जीवन रेखा, वेदांत आणि सोनी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभाग नोंदवला.
१०० दिवसीय शोध मोहीम आणि आरोग्य शिबिरे
जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून २४ मार्च २०२६ पासून जिल्हाभरात १०० दिवसीय क्षयरोग शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत अतिजोखीम असलेल्या गावांमध्ये 'आयुष्यमान आरोग्य शिबिरांचे' आयोजन करून रुग्णांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत.
या कार्यक्रमास इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मन्मथ भातंबरे, आयएमए अध्यक्ष डॉ. अभय कदम, कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. वैशाली तांभाळे, जिल्हा नेत्रचिकित्सक डॉ. श्रीधर पाठक, डॉ. अभिजीत यादव, रेड क्रॉस सोसायटीचे पदाधिकारी विनोद कुचेरिया, राजेश पाटील, श्रीकांत करवा आणि मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती मजगे, डॉ. योगेश गवसाने तसेच डॉ. हर्षवर्धन राऊत उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis