अकोल्यात गॅस टंचाईच्या अफवेमुळे मोठी गर्दी!
अकोला, 25 मार्च (हिं.स.)। अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे गॅस एजन्सी चालक गॅसचा तुटवडा नसल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात ग्राहकांना मात्र रिकाम्या हाती परतावे लागत
Photo


अकोला, 25 मार्च (हिं.स.)। अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे गॅस एजन्सी चालक गॅसचा तुटवडा नसल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात ग्राहकांना मात्र रिकाम्या हाती परतावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. अकोल्यातील नागरिक पहाटे ५ वाजल्यापासून सिलिंडर मिळवण्यासाठी एजन्सीबाहेर रांगा लावत आहेत. मात्र, तासनतास उभे राहिल्यानंतर स्टॉक संपला आहे असे उत्तर देऊन एजन्सीकडून ग्राहकांना आल्या पाऊली परत पाठवले जात आहे. गेल्या १० दिवसांपासून बुकिंग करूनही सिलिंडर मिळत नसल्याने गृहिणींचे स्वयंपाकघर अक्षरशः थंड पडले आहे. अधिकृत दराने सिलिंडर मिळत नाही. प्रशासनाने अलीकडेच केलेल्या छापेमारीत २३ घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभाग प्रयत्नशील आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असले, तरी प्रत्यक्ष वितरणातील गोंधळामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. संकटामुळे अकोलेकरांना आता पर्यायी इंधन म्हणून कोळसा किंवा लाकडाचा आधार घ्यावा लागत आहे, ज्यामुळे कोळशाच्या आणि लाकडाच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande