सामाजिक न्याय योजनांच्या जनजागृती प्रदर्शनाचे उद्घाटन
अकोला, 25 मार्च (हिं.स.) : जिल्हा माहिती कार्यालयातर्फे व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाच्या सहकार्याने सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या विशेष प्रदर्शनाचा शुभारंभ आज उपविभागीय कार्यालय (तहसील) येथे करण्यात आला. अनुसूचित
Photo


अकोला, 25 मार्च (हिं.स.) : जिल्हा माहिती कार्यालयातर्फे व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाच्या सहकार्याने सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या विशेष प्रदर्शनाचा शुभारंभ आज उपविभागीय कार्यालय (तहसील) येथे करण्यात आला.

अनुसूचित जातींसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी गोपाळ वाघमारे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.

या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार कुणाल झाल्टे, तसेच जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रदर्शनामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती छायाचित्रे, माहिती फलक आणि दृकश्राव्य माध्यमांच्या साहाय्याने सादर करण्यात आली आहे. अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांसाठी शिक्षण, स्वयंरोजगार, निवास तसेच आर्थिक सहाय्य योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांनी अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तर गोपाळ वाघमारे यांनी एकाच छताखाली योजनांची माहिती मिळत असल्याने हे प्रदर्शन नागरिकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. हर्षवर्धन पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.

हे प्रदर्शन 27 मार्चपर्यंत सुरू राहणार असून नागरिक, अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande