
अकोला, 25 मार्च (हिं.स.) । महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन संलग्न बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र बॉक्सिंग संघ निवड चाचणी स्पर्धा 2026 मध्ये अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने SAI राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथे 21 ते 22 मार्च दरम्यान झालेल्या या स्पर्धेत अकोल्याच्या खेळाडूंनी 11 सुवर्ण, 6 रजत आणि 8 कांस्य अशी एकूण 25 पदके जिंकली.
U-17 मुलांच्या गटात संस्कार आत्राम (46 कि.ग्रा.), करण माळी (48 कि.ग्रा.), गोपाल गणेशे (52 कि.ग्रा.), गौरव दीक्षित (54 कि.ग्रा.), पार्थ चोपडे (57 कि.ग्रा.), युगल खोटे (63 कि.ग्रा.) आणि शाश्वत महल्ले (66 कि.ग्रा.) यांनी सुवर्ण पदक पटकावले. साई संद्री (46 कि.ग्रा.) याने रजत, तर जयेश कुंभार, वैभव दामोदर आणि गौरांग भरणे यांनी कांस्य पदके जिंकली.मुलींच्या U-17 गटात इशिका झांबरे हिने सुवर्ण पदक जिंकले. अक्षरा खंडारे हिला रजत, तर गार्गी राऊत आणि कनक अग्रवाल यांनी कांस्य पदके मिळवली.U-19 युथ गटात मुलांमध्ये रिजवान शाह (65 कि.ग्रा.), अथर्व भट्ट (70 कि.ग्रा.) आणि ऋषिकेश चव्हाण (85 कि.ग्रा.) यांनी सुवर्ण पदके मिळवली. शिवराज देशमुख याने रजत, तर स्मित राजपूत याने कांस्य पदक पटकावले.
मुलींच्या U-19 गटात समीक्षा सोळंके, सुहानी बोराडे आणि श्रद्धा राहटकर यांनी रजत पदके जिंकली, तर श्रद्धा खोब्रागडे आणि अनुष्का गुप्ता यांनी कांस्य पदके मिळवली.
या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर U-17 गटातील सुवर्णपदक विजेत्यांची नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी, तर U-19 गटातील सुवर्णपदक विजेत्यांची गुवाहाटी (आसाम) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
संघासोबत प्रशिक्षक गजानन कबीर, आदित्य मने, योगेश निषाद आणि साद सय्यद यांनी मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी व आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सतीशचंद्र भट्ट यांचेही खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे