कोल्हापूर विमानतळासाठी ५० कोटींचा निधी मंजूर, विस्ताराला मिळणार गती
कोल्हापूर, २५ मार्च (हिं.स.) : कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाने ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, या निधीमुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामांना गती मिळेल. मंजूर निधीतून कोल्हापूर-हुपरी म
कोल्हापूर विमानतळ


कोल्हापूर, २५ मार्च (हिं.स.) : कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाने ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, या निधीमुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामांना गती मिळेल. मंजूर निधीतून कोल्हापूर-हुपरी मार्गावरील वळतीकरण तसेच रस्त्याचे काम करण्यात येणार आहे, ज्यामुळे विमानतळ विस्ताराचा मार्ग मोकळा होईल.

सध्याची १३७० मीटर धावपट्टी २३०० मीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला गेला असून, या विस्तारासाठी अतिरिक्त ६७ एकर जमीन आवश्यक होती. जिल्हा प्रशासनाने तीन वर्षांच्या प्रक्रियेनंतर ही जमीन संपादित केली असून, उर्वरित ६७ एकर जमीन २० जानेवारी २०२५ रोजी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात देण्याचे नियोजन झाले होते. मात्र, कोल्हापूर-हुपरी रस्त्याचा प्रश्न सुटल्याशिवाय प्राधिकरणाने ताब्यात घेण्यास नकार दिला होता. आता निधी मंजूर झाल्यामुळे हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

धावपट्टी २३०० मीटरपर्यंत वाढल्यानंतर मोठ्या आकाराची विमाने कोल्हापूर विमानतळावर उतरू शकतील. त्यामुळे मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद यांसारख्या प्रमुख शहरांशी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होण्याची शक्यता निर्माण होईल.

राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी २०२५-२६ आर्थिक वर्षात शासनाने १६९ कोटी २१ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यामध्ये कोल्हापूर विमानतळासाठी ५० कोटींचा निधी दिला गेला आहे. या निधीचा वापर कोल्हापूर-हुपरी रस्त्याचे वळतीकरण, भूसंपादन, नवीन रस्ता बांधकाम आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या स्थापनेसाठी केला जाईल.

विस्तारामुळे भविष्यात मोठ्या विमानांची सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होतील आणि कोल्हापूरसह पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड तसेच दक्षिण महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना अधिक पर्यटक आकर्षित होतील. शासनाने मंजूर निधी ३१ मार्च २०२६ पूर्वी खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत आणि खर्चाबाबत उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना देखील जारी केल्या आहेत.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande