
रत्नागिरी, 25 मार्च, (हिं. स.) :समाजात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जनजागृती घडवून आणण्यासाठी रत्नागिरीत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. रत्नागिरीतील कीर्तनसंध्या परिवाराच्या संकल्पनेतून ‘रामाचा जयजयकार’ हा सायबर संस्कार आणि सायबर सुरक्षा विषयावर आधारित उपक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रामनवमीच्या शुभमुहूर्तावर सादर होणारा हा उपक्रम पारंपरिक भक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम साधणार आहे. कीर्तनाच्या माध्यमातून सायबर सुरक्षा, डिजिटल सावधगिरी आणि सामाजिक जबाबदारी याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे लेखन रत्नागिरीतील डॉ. अक्षय फाटक यांनी केले असून, सादरीकरण विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे यांच्या प्रभावी आवाजात होणार आहे. संपूर्ण संकल्पना कीर्तनसंध्या परिवाराची असून व्हिडिओ संपादनाची जबाबदारी चिन्मय जोशी यांनी सांभाळली आहे. शुभांगीताई आफळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.भक्तिमय वातावरणात सायबर संस्कारांचा संदेश देणारा हा उपक्रम समाजासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी