अभिनेता मिनार पाटील यांची कोमसाप नाट्य समितीवर निवड
रत्नागिरी, 25 मार्च, (हिं. स.) : चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ''अग्निपंख’ नाटकासाठी राज्यस्तरीय अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळविणारे मिनार पाटील यांची कोकण मराठी साहित्य परिषद नाट्य विभागाच्या समितीवर नि
मिनार पाटील यांचा गौरव


रत्नागिरी, 25 मार्च, (हिं. स.) : चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत 'अग्निपंख’ नाटकासाठी राज्यस्तरीय अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळविणारे मिनार पाटील यांची कोकण मराठी साहित्य परिषद नाट्य विभागाच्या समितीवर निवड करण्यात आली आहे.

मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकामध्ये पार पडलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ३५ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात मिनार पाटील यांचा कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते मानपत्र, शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच निवडीचे पत्रही देण्यात आले.

समर्थ रंगभूमी संस्थेतक्ऱे प्र. ल. मयेकर लिखित ‘अग्निपंख’ हे नाटक रत्नागिरीत सादर करण्यात आले होते. या नाटकातील दमदार अभिनयासाठी रत्नागिरीचा सुपुत्र तथा कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांचा सुपुत्र, अभिनेता मिनार गजानन पाटील याला राज्यस्तरीय उत्कृष्ट अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. जिल्हा स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून या नाटकाने राज्य स्तरावर धडक मारली होती.

त्यांचे कौतुक करताना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या समवेत कोमसाप अध्यक्षा नमिताताई कीर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, विश्वस्त एल. बी. पाटील आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande