
नांदेड, 25 मार्च (हिं.स.)। बिलोली तालुका खरेदी विक्री संघाच्या सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात बोलावण्यात आलेल्या पदाधिकारी निवड प्रक्रियेत अध्यक्ष पदासाठी अरविंद लक्ष्मणराव ठक्करवाड यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी हणमंत पाटील खरबाळे यांचा प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे प्राधिकृत अधिकारी ए. जी. पद्मवार यांनी घोषित केले.
सदर खरेदी विक्री संघाची निवडणूक यापूर्वी पार पडली होती. त्यात ११ सदस्य बिनविरोध निवडून आले तर दोन जगासाठी निवडणूक झाली होती. सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात पदाधिकारी निवडीसाठी सर्व १३ सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी ठक्करवाड गटाचे ९ व खतगावकर गटाचे ४ सदस्य उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष पदासाठी अरविंद लक्ष्मणराव ठक्करवाड व उपाध्यक्ष पदासाठी हणमंत मारोतीराव खरबाळेया दोघांचेच अर्ज आल्याने या पदांसाठी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. तत्पूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरु होण्या अगोदरच खतगावकर गटाच्या ४ सदस्यांनी सभागृह सोडले. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, आ. जितेश अंतापूरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, पॅनलप्रमुख लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis