
रायगड, 26 मार्च (हिं.स.) : कर्जत तालुक्यात व्हॉट्सअॅपवर आलेली संशयास्पद ‘एपीके’ फाईल उघडल्यामुळे एका नागरिकाची तब्बल 10 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गारपोली (ता. कर्जत) येथे घडली. फिर्यादी यांच्या मोबाईलवर 26 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 2.45 वाजता एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून ‘आरटीओ-एपीके’ नावाची फाईल पाठविण्यात आली होती. संबंधित फाईल उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये काहीही आढळले नाही, त्यामुळे फिर्यादी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
मात्र, दुसऱ्याच दिवशी दुपारी 3.23 वाजता 5 लाख रुपये आणि 3.25 वाजता आणखी 5 लाख रुपये असे एकूण 10 लाख रुपये फिर्यादी यांच्या सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक, बदलापूर शाखेतील खात्यातून वजा झाल्याचे संदेश प्राप्त झाले. या प्रकारामुळे अज्ञात व्यक्तीने एपीके फाईलच्या माध्यमातून मोबाईलमध्ये प्रवेश मिळवून बँक खात्यातून पैसे काढल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 147/2026 दाखल करण्यात आला असून माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 (सुधारित 2008) कलम 66(डी) तसेच भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 318(4) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अनोळखी क्रमांकावरून आलेल्या एपीके किंवा इतर कोणत्याही संशयास्पद फाईल्स उघडू नयेत, तसेच ऑनलाइन बँकिंग व्यवहार करताना विशेष दक्षता घ्यावी.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)