
सोलापूर, 27 मार्च, (हिं.स.)। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजी, सीएनजी मिळत नाही, ३२ रुपयांनी भाव वाढले आहेत. गॅस भरायला तासन्तास रांगेत उभारावे लागते, अनेक पंप बंद आहेत, अशी कारणे पुढे करत रिक्षा चालकांनी भाडेवाढ केली आहे. आता रिक्षातून प्रवास करताना छोट्या टप्प्यासाठी ५ ते १० रुपये आणि लांबच्या प्रवासासाठी १५ रुपये जादा मोजावे लागत आहेत.
मंगळवेढा रोड, अक्कलकोट रोड, ७० फूट रोड या मार्गावर भाडेवाढ केली, पण त्याठिकाणी प्रवाशांची कोणतीही अडचण नसल्याचे रिक्षाचालक सांगतात. पण, होटगी रोड, विजयपूर रोड या मार्गावरील प्रवासी वाद घालत असल्याचेही चालकांनी सांगितले. रेल्वे स्टेशन ते स्टॅण्ड आणि स्टॅण्डपासून रेल्वे स्टेशनपर्यंत यायला आता प्रवाशांना ३० रुपये द्यावे लागत आहेत. १५ दिवसांपूर्वी हा दर १५ ते २० रुपये होता. प्रवाशांना रिक्षा भाड्याने करायची असल्यास ३० ते ५० रुपये आता ज्यादा द्यावे लागत आहेत. अनेक प्रवाशांनी त्यांच्या तक्रारी शहर पोलिस, आरटीओ कार्यालयास कळविल्या आहेत. पण, गॅस तुटवड्यामुळे अधिकाऱ्यांनीही कानावर बोट ठेवल्याची स्थिती आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड