
सोलापूर, 27 मार्च (हिं.स.)।मोहोळ तालुक्याच्या काही भागात झालेल्या वादळी वारे, गारांचा पाऊस यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांच्या घडांचे मनी फुटून बागेत खच पडला आहे. डाळिंबाच्या बागा उपसून पडल्या, अनेक घरावरील पत्रे उडाले, केळीच्या बागा भुई सपाट झाल्या, मकेचे व कांद्याचे पीक भुईसपाट झाले आहे. रात्री पडलेल्या गारा सकाळ पर्यंत तशाच होत्या. अनेक शेतकऱ्यांनी आयुष्याची राख रांगोळी झाली असे मोबाईलला स्टेटस ठेवले आहेत विद्युत खांब ही मोठ्या प्रमाणात पडल्याने विद्युत पुरवठा ही खंडित झाला आहे. एका तासात होत्याचे नव्हते झाले शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या पाठी मागचे संकटाचे शुक्ल कास्ट संपता संपेना. सोमवारी कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे.मोहोळ तालुक्यात द्राक्षाचे सुमारे 5 हजार एकर, डाळिंबाचे 2 हजार एकर, गुलाब, शेवंती, झेंडू फुलांचे 200 एकर, तर कांदा, मका या पिकांचे सुमारे 5 हजार एकर क्षेत्र आहे. यातील काही द्राक्ष विकली गेली आहेत. वादळी वाऱ्याने डाळिंबाच्या बागा उपसून पडल्या आहेत. अनेक घरावरील पत्रे उडून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. अशोक भोसले या शेतकऱ्याच्या गाईची शिंगे मोडली तर पत्र्या मुळे गाईचे थोडे पोट कापले आहे. मागास गहू पूर्णपणे झोपला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड