अमेरिकेत ट्रम्प यांची धोरणे, महागाई आणि इराण युद्धाचा निषेध करण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर
वॉशिंग्टन , 29 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष आता 30व्या दिवशी पोहोचला असून संपूर्ण प्रदेशात तणाव शिगेला पोहोचला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेतील अनेक भागांत शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराण युद्ध धोर
अमेरिकेत ट्रम्प यांची धोरणे, महागाई आणि इराण युद्धाचा निषेध करण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर


वॉशिंग्टन , 29 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष आता 30व्या दिवशी पोहोचला असून संपूर्ण प्रदेशात तणाव शिगेला पोहोचला आहे.

अशा परिस्थितीत अमेरिकेतील अनेक भागांत शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराण युद्ध धोरणाविरोधात ‘नो किंग्स’ नावाने मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनात आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणांवर, वाढती महागाई आणि इराणसोबत सुरू असलेल्या युद्धावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ही आंदोलने मोठ्या शहरांपासून लहान गावांपर्यंत झाली असून रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट या दोन्ही पक्षांच्या राज्यांतील नागरिक त्यात सहभागी झाले. यावेळी निदर्शकांनी घोषणाबाजी केली, फलक झळकावले तसेच गाणे-वादन आणि नृत्याच्या माध्यमातून आपला विरोध नोंदवला. न्यूयॉर्क शहरात मिडटाउन मॅनहॅटनपासून मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये स्थलांतर धोरण, ट्रम्प प्रशासन आणि इराण संघर्षाविरोधातील फलक दिसून आले. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एम्बारकाडेरो प्लाझापासून सिव्हिक सेंटरपर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अमेरिकन ध्वजासोबत युक्रेन आणि ट्रान्सजेंडर हक्कांच्या समर्थनार्थ बॅनरही झळकावण्यात आले.

सेंट पॉल, मिनेसोटा येथेही मोठी रॅली आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये प्रसिद्ध रॉक कलाकार ब्रूस स्प्रिंगस्टीन यांनी सहभाग घेतला. त्यांनी मिनेसोटा राज्याला संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले आणि जानेवारी महिन्यात फेडरल इमिग्रेशन एजंट्सच्या कारवाईत मृत्यू झालेल्या एलेक्स प्रेट्टी आणि रिनी गुड यांना श्रद्धांजली वाहिली. मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्झ यांनी फेडरल स्थलांतर धोरणांवर कठोर टीका करत स्थानिक नागरिकांच्या धैर्य आणि सामुदायिक एकतेचे कौतुक केले.

विशेष म्हणजे, अमेरिकेत सुरू असलेल्या ‘नो किंग्स’ आंदोलनाची ही तिसरी लाट आहे. यापूर्वीही गेल्या वर्षी दोन मोठी आंदोलने झाली होती, ज्यामध्ये लाखो लोक सहभागी झाले होते. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि अर्थव्यवस्थेतील मंदी ही या आंदोलनामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. दरम्यान, फ्लोरिडातील वेस्ट पाम बीच येथे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सुमारे 50 समर्थक आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वाद झाला. मात्र, एकूणच ही आंदोलने शांततेत पार पडली असून नागरिकांनी सरकारच्या धोरणांविरोधात आणि आर्थिक समस्यांविषयी आपली नाराजी लोकशाही मार्गाने व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande