
तेहरान , 29 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियामध्ये अमेरिकन सैन्य दलांची वाढती तैनाती सुरू असताना, इराणच्या माध्यमांनी वॉशिंग्टनला कठोर इशारा दिला आहे. शनिवारी इराणच्या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या अंकाच्या पहिल्या पानावर मोठ्या अक्षरांत “वेलकम टू हेल” असं शीर्षक देत, इराणी भूमीत प्रवेश करणारे अमेरिकन सैनिक केवळ शवपेटीतूनच परततील, असा इशारा देण्यात आला आहे.
या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवरच सुमारे 3,500 अमेरिकन मरीन सैनिक पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (सेंटकॉम) क्षेत्रात तैनात करण्यात आले आहेत. हे सैनिक अमेरिकेच्या सर्वात मोठ्या उभयचर हल्लेखोर युद्धनौकांपैकी एक असलेल्या युएसएस त्रिपोलीद्वारे जपानमधून रवाना करण्यात आले. पश्चिम आशियातील अमेरिकेची लष्करी ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, ही तैनाती रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या खर्ग बेटावर ताबा मिळवण्यासाठी संभाव्य अमेरिकन लष्करी मोहिमेची तयारी असू शकते. याच महिन्याच्या सुरुवातीला ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत या बेटाला लक्ष्य करण्यात आले होते.
सेंटकॉम च्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारीनंतर अमेरिकन सैन्याने इराणच्या अनेक लष्करी संरचनांवर हल्ले केले आहेत. त्यामध्ये इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)शी संबंधित ठिकाणे, हवाई संरक्षण प्रणाली आणि क्षेपणास्त्र तळ, नौदल संसाधने, शस्त्रनिर्मिती केंद्रे यांचा समावेश आहे. अमेरिकन सैन्याने आतापर्यंत 11,000 हून अधिक लढाऊ उड्डाणे केली असून 150 पेक्षा जास्त इराणी जहाजांचे नुकसान किंवा विनाश केल्याचा दावा करण्यात आला आहे.
इराणच्या माध्यमांचा हा इशारा अमेरिकन सैनिक आणि वॉशिंग्टन प्रशासनाला थेट संदेश मानला जात आहे. इराणी भूमीत कोणताही अमेरिकन हस्तक्षेप मोठ्या नुकसानीस कारणीभूत ठरेल, असे या वृत्तपत्राने स्पष्ट केले आहे. तज्ज्ञांच्या मते, या इशाऱ्यांसह वाढती लष्करी तैनाती पश्चिम आशियातील तणाव अधिक तीव्र करू शकते आणि त्याचा परिणाम प्रादेशिक तसेच जागतिक सुरक्षेवर होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode