
■ मालमत्ता कर वसुलीसाठी आक्रमक मोहीम ■ आतापर्यंत टॅक्स भरलेले ५४,१२३ मालमत्ताधारकांचे कर संकलन विभागाने मानले आभार ■ ३१ मार्च पर्यंत टॅक्स भरणा न करणारे थकबाकीदार यांची नावे २ एप्रिल पासून जाहीर होणार ■ थकबाकीदार ऐवजी करदाते म्हणुन प्रसिद्ध व्हावे- मनपाचे आवाहन
लातूर, 29 मार्च (हिं.स.)।
आर्थिक वर्ष २०२५-२६ संपण्यास अवघे ३ दिवस बाकी असतानाही काही थकबाकीदार मालमत्ताधारक टॅक्स भरणा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. वर्षाच्या सुरुवातीपासूनच मालमत्ताधारकांसाठी विविध सुट योजना देण्यात आले होती. त्यानंतर तीन वेळेस १००% शास्ती सुट योजना देखील लागु केली. त्यानंतर दोन वेळेस ८०% शास्ती सुट व पुन्हा ७०% शास्ती सुट लागु करून तीन वेळेस मुदतवाढ सुधा देण्यात आली. शेवटची संधी म्हणुन ५०% शास्ती सुट सध्या देण्यात येते. यादरम्यान तब्बल ५४ हजार हून अधिक मालमत्ताधारकांनी ७० कोटीचा कर भरणा केला. परंतु तब्बल १० वेळा विविध सुट योजना लागु करूनही काही थकबाकीदार मालमत्ताधारक टॅक्स भरणा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. महापालिकेच्या कर संकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी जोरदार जप्ती कारवाई मागील २ महिना पासून सुरू केली आहे. कर वसुलीसाठी आत्तापर्यंत जप्ती मोहीम, नळ तोडण्यात येत आहेत. त्यानंतरही काही थकबाकीदार टॅक्स भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने अश्या मालमत्ताधारकां विरुद्ध धडक कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी कर संकलन विभागास दिले. त्यानुसार आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस (३१ मार्च) पर्यंत टॅक्स भरणा करणार नाहीत असे थकबाकीदार यांची नावे २ एप्रिल पासून वर्तमानपत्रात व चौकाचौकात बॅनर वर जाहीर केले जाणार आहेत. यामधे पहिल्या टप्यात ७५ हजार वरील थकबाकीदार यांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.
यामध्ये निवासी तसेच, दुकानदार,व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, हॉटेलचालक, उद्योजक, बँक, पतसंस्था, मोकळ्या जमिनींचे मालक, विविध संस्था आदी थकबाकीदार मालमत्ताधारकांची नावे असतील.
आता प्रत्येक झोनमधील मोठे थकबाकीदारांची यादी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने. त्यामुळे थकबाकीदारांनी आपले नाव जाहीर होणे टाळण्यासाठी सध्या सुरू असलेले ५०% शास्ती सुट योजनेचा लाभ घेऊन टॅक्स भरावे व थकबाकीदार ऐवजी करदाते म्हणुन प्रसिद्ध व्हावे असे आवाहन उपायुक्त (कर संकलन) डॉ पंजाब खानसोळे यांनी केले आहे.
दरम्यान, थकित बिल भरण्यासाठी नागरिकांना मदत होण्यासाठी ऑनलाईन सुविधा व अधिकचे कॅश काऊंटर वाढविले आहेत व सुट्टीच्या दिवशी सुध्दा सुरू ठेवले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis