आयफोनच्या किंमती वाढण्याची शक्यता; सवलती कमी झाल्याने ग्राहकांवर अतिरिक्त भार
मुंबई, 30 मार्च (हिं.स.)। भारतात स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. एपलच्या आयफोनच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, याचा परिणाम केवळ नवीन मॉडेल्सपुरता मर्यादित राहणार नाही तर जुन्या मॉडेल्स
Older IPhones Costlier


मुंबई, 30 मार्च (हिं.स.)। भारतात स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. एपलच्या आयफोनच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, याचा परिणाम केवळ नवीन मॉडेल्सपुरता मर्यादित राहणार नाही तर जुन्या मॉडेल्सवरही होणार आहे. आतापर्यंत अनेक ग्राहक नवीन आयफोन लॉन्च झाल्यानंतर एक-दोन वर्षे जुने झालेले मॉडेल कमी किमतीत खरेदी करण्याचा पर्याय निवडत होते. मात्र आता या धोरणावर परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत.

आयफोन 16,आयफोन 15 आणि आयफोन 14 सारख्या लोकप्रिय मॉडेल्सच्या किमतीत सुमारे तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या किंमत वाढीमागे अधिकृत एमआरपीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. परंतु एपलने रिटेलर्सना दिला जाणारा “डिमांड जनरेशन सपोर्ट” (डीजी सपोर्ट) अचानक बंद केल्यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या सवलती जवळपास संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हा डीजी सपोर्ट रिटेलर्ससाठी अत्यंत महत्त्वाचा होता, कारण त्याच्या मदतीने ते ग्राहकांना आकर्षक ऑफर्स आणि डिस्काउंट देऊ शकत होते. त्यामुळे आयफोन तुलनेने कमी किमतीत उपलब्ध होत होता. आता हा सपोर्ट बंद झाल्याने रिटेलर्सना स्वतःच्या मार्जिनमधून सवलत देणे कठीण होणार आहे, आणि याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. परिणामी, ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागतील.

दरम्यान, ही परिस्थिती केवळ एपलपुरती मर्यादित नाही. सैमसंग, ओप्पो, वीवो और श्याओमी यांसारख्या प्रमुख अँड्रॉइड ब्रँड्सनीही गेल्या काही महिन्यांपासून आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ करण्यास सुरुवात केली आहे. यामागे मोबाईल पार्ट्स, विशेषतः मेमरी आणि स्टोरेज घटकांच्या किमतीत झालेली वाढ हे प्रमुख कारण मानले जात आहे.

उत्पादन खर्च वाढल्यामुळे कंपन्या आता विक्री वाढवण्यापेक्षा नफा टिकवण्यावर अधिक भर देत आहेत. काही कंपन्यांनी तर आपले प्रॉडक्शन टार्गेट सुमारे वीस टक्क्यांपर्यंत कमी केल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे बाजारात पुरवठा कमी होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम किंमतींवर होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, आयफोनच्या विक्रीवर या किंमत वाढीचा फारसा परिणाम होणार नाही. भारतात मोठ्या प्रमाणावर आयफोन ईएमआयवर विकले जात असल्यामुळे ग्राहकांना एकरकमी रक्कम भरण्याऐवजी हप्त्यांमध्ये पैसे देणे सोयीचे जाते. त्यामुळे किंमत वाढली तरी मागणी स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र अँड्रॉइड स्मार्टफोन बाजारासाठी ही परिस्थिती थोडी आव्हानात्मक ठरू शकते. जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण यामुळे अँड्रॉइड फोनची विक्री कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकूणच, भारतीय स्मार्टफोन बाजारात सध्या किंमती वाढण्याचा ट्रेंड स्पष्टपणे दिसून येत आहे. आयफोन असो किंवा अँड्रॉइड फोन, ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande