एप्रिल महिन्यात बँका तब्बल १४ दिवस राहणार बंद
मुंबई, 30 मार्च (हिं.स.)। मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असताना १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर एप्रिल २०२६ महिन्यात देशभरातील बँकांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक समोर आले असून ग्राहकांसाठी ही महत्त्वाची माहिती आ
Bank close


मुंबई, 30 मार्च (हिं.स.)। मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असताना १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर एप्रिल २०२६ महिन्यात देशभरातील बँकांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक समोर आले असून ग्राहकांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या कॅलेंडरनुसार एप्रिल महिन्यात विविध कारणांमुळे एकूण १४ दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे बँकेत प्रत्यक्ष जाऊन काम करणाऱ्या ग्राहकांनी आधीच नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.

महिन्याची सुरुवातच सुट्टीने होणार असून १ एप्रिल रोजी संपूर्ण देशभरातील बँका बंद राहतील. या दिवशी बँकांचे वार्षिक खाते बंद करण्याचे काम चालू असल्यामुळे ग्राहकांसाठी कोणतेही व्यवहार होणार नाहीत. चेक क्लिअरिंग, काऊंटर व्यवहार किंवा रोख जमा-उचल यासारखी कामे या दिवशी पूर्णपणे बंद राहतील. त्यानंतर ३ एप्रिल रोजी गुड फ्रायडेनिमित्त देशभर बँका बंद राहतील, तर ५, १२, १९ आणि २६ एप्रिल या सर्व रविवारी नियमित साप्ताहिक सुट्टीमुळे बँका बंद असतील. याशिवाय ११ एप्रिल दुसरा शनिवार आणि २५ एप्रिल चौथा शनिवार असल्याने या दिवशीही बँकांचे कामकाज होणार नाही.

एप्रिल महिन्यात विविध प्रादेशिक सणांमुळे काही ठिकाणी अतिरिक्त सुट्ट्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. २ एप्रिल रोजी पुण्य गुरुवार निमित्त केरळमधील काही शहरांमध्ये बँका बंद राहतील. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह महाविषुव संक्रांती, बैसाखी, तमिळ नववर्ष अशा अनेक सणांमुळे देशातील बहुतांश ठिकाणी बँका बंद राहतील. १५ एप्रिल रोजी बंगाली नववर्षानिमित्त अगरतळा, गुवाहाटी, कोलकाता, कोची, तिरुवनंतपुरम आदी शहरांमध्ये बँकांना सुट्टी असेल, तर १६ एप्रिल रोजी बोहाग बिहू निमित्त गुवाहाटीत बँका बंद राहतील. २० एप्रिल रोजी अक्षय तृतीया आणि बसव जयंतीमुळे बेंगळुरूमध्ये बँकांचे कामकाज ठप्प राहील, तर २१ एप्रिल रोजी गरिया पूजेमुळे अगरतळ्यात बँका बंद असतील.

बँकांच्या या सुट्ट्यांमुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी डिजिटल सुविधा मात्र सुरूच राहणार आहेत. ऑनलाईन बँकिंग, यूपीआय, मोबाईल बँकिंग आणि एटीएमच्या माध्यमातून पैसे पाठवणे, बिल भरणे किंवा रोख रक्कम काढणे यांसारखे व्यवहार कोणत्याही अडथळ्याशिवाय करता येतील. त्यामुळे तातडीची कामे असल्यास ग्राहकांनी या सुविधांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, एप्रिल २०२६ महिन्यात शेअर बाजारातही एकूण १० दिवस व्यवहार होणार नाहीत. आठवड्याच्या शनिवार-रविवार व्यतिरिक्त ३ एप्रिल रोजी गुड फ्रायडे आणि १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनीही व्यवहाराचे नियोजन करताना या सुट्ट्यांचा विचार करणे आवश्यक आहे.

एकूणच, एप्रिल महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांची संख्या जास्त असल्याने आर्थिक व्यवहार आधीच ठरवून करण्याचा सल्ला दिला जात आहे. योग्य नियोजन केल्यास कोणतीही अडचण न येता सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण करता येतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande