
नागपूर, 30 मार्च (हिं.स.)। देशातील आघाडीची सौर ऊर्जा निर्मिती कंपनी 'अवादा इलेक्ट्रो'ने आपल्या विस्तार धोरणाचा भाग म्हणून राज्यस्तरीय 'चॅनल मीट' कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कंपनीने महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील रिटेल सोलर मार्केट आणि वितरित सौर ऊर्जा क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नागपूर येथे या मेळाव्याला मोठ्या संख्येने ईपीसी कंत्राटदार, छतावरील सौर यंत्रणा बसवणारे तंत्रज्ञ आणि प्रादेशिक चॅनल पार्टनर्स उपस्थित होते.
या विस्तार योजनेबाबत माहिती देताना अवादा इलेक्ट्रो लिमिटेडचे अध्यक्ष विनीत मित्तल म्हणाले की, नागपूर हे शहर कंपनीच्या उत्पादन केंद्राच्या जवळ असल्याने व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या भारतात छतावरील सौर ऊर्जेचा वापर झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी स्थानिक स्तरावर दर्जेदार मॉड्यूल्स उपलब्ध करून देऊन सामान्यांपर्यंत सौर ऊर्जा पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे केवळ राज्याच्या ऊर्जा क्षमतेत वाढ होणार नाही, तर स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि पुरवठा साखळीलाही बळकटी मिळाली आहे. अवादा इलेक्ट्रोचे हे सौर मॉड्यूल्स आंतरराष्ट्रीय मानकांनुसार प्रमाणित असून ते केंद्र सरकारच्या एएलएमएम सूचीमध्ये समाविष्ट आहेत.
अवादा इलेक्ट्रोने याप्रसंगी आपल्या प्रगत ७२० डब्ल्यूपी एन-टाईप टॉपकॉन सोलर मॉड्यूलचे प्रदर्शन केले. हे मॉड्यूल उच्च कार्यक्षमता देणारे असून यामुळे सौर प्रकल्पांचा एकूण खर्च कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. सध्या कंपनीची एकूण सौर मॉड्यूल उत्पादन क्षमता ८.५० गिगावॉट इतकी असून, नागपूर आणि उत्तर प्रदेशातील दादरी येथील प्रकल्पांमधून या मॉड्यूल्सची निर्मिती केली जात आहे. नागपूर येथील प्रकल्पामध्ये पूर्णपणे स्वयंचलित उत्पादन साखळी असून, अत्यंत कमी वेळात जागतिक दर्जाच्या गुणवत्तेचे मॉड्यूल्स येथे तयार केले जातात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule