
नागपूर, 30 मार्च (हिं.स.) - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील काॅंग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकरता पडोळे दिल्लीला जाण्यासाठी नागपूर विमानतळाकडे निघाले असता त्यांच्या वाहनाला एका ट्रकने जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, पडोळे यांच्या कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. परंतु, सुदैवाने पडोळे या अपघातामधून थोडक्यात बचावले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीला जाण्यासाठी खासदार प्रशांत पडोळे हे सुरक्षारक्षक आणि चालकासह पहाटे नागपूर विमानतळाकडे निघाले होते. त्यावेळी नागपूर जिल्ह्यातील हल्दीरामसमोर ट्रकने त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली. नशीब बलवत्तर या अपघातातून खासदार प्रशांत पडोळे थोडक्यात बचावले. मात्र, ते या अपघातात किरकोळ जखमी झाले. किरकोळ जखमी झाल्यानंत पडोळे यांनी एका दुचाकीस्वराला लिफ्ट मागून नागपूरात प्राथमिक उपचार घेतले. त्यानंतर नागपूर विमानतळावर पोहोचून ते दिल्लीकडे रवाना झाले. यापूर्वीही खासदार प्रशांत पडोळे यांच्या वाहनाचा नागपूर इथं काही महिन्यांपूर्वी भीषण अपघात झाला होता. त्यातही ते किरकोळ जखमी झाले होते.
याच मार्गावर डॉ. पडोळे यांच्यासोबत झालेला हा तिसरा अपघात आहे. तिन्हीही वेळा अपघात एकाच मार्गावर, तिन्ही वेळा ताफ्यातील गाडीला ट्रकनेच धडक दिल्याने संशय बळावला आहे. कार-ट्रक अपघाताची पद्धतही तिन्ही वेळेस सारखीच असल्याची माहिती समोर येत आहे. ट्रकने दिलेल्या धडकेत पडोळे यांच्या कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, एअरबॅग्ज आणि वेळेत मिळालेल्या संरक्षणामुळे डॉ. पडोळे यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही, असे पोलिस सुत्रांनी सांगितले.
खासदार पडोळे यांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, भंडाऱ्याहून पहाटे ५ वाजता ते वाहनाने निघाले होते. वाहनामध्ये चालक राहुल गिरीपुंजे, खडसे नामक बॉडीगार्ड आणि भंडारा येथील देवेंद्र उर्फ अप्पू शहारे हे व्यक्ती होते. मौदा ते वडोदा या दरम्यान समोरील ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने खासदारांचे वाहन ट्रकवर जाऊन आदळले. यामुळे पुढील भाग मोठ्या प्रमाणावर क्षतीग्रस्त झाला. यात खासदार पडोळे आणि देवेंद्र शहारे यांच्या पायाला दुखापत झाली. या अपघाताची नोंद वडोदा येथील पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. अपघातानंतर खासदार पडोळे सात वाजताच्या विमानाने दिल्लीकडे रवाना झाले, तर देवेंद्र शहारे यांच्यावर वडोदा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, यापूर्वी ११ सप्टेंबर २०२५ रोजी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीदरम्यान मतदान आटोपून परत येताना पहाटे त्यांच्या वाहनाला अपघात घडला होता. खासदार पडोळे यांच्या ताफ्यामध्ये पायलट वाहन नाही. यापूर्वी झालेल्या अपघातानंतर त्यांनी पायलट वाहनाची मागणी केली होती. मात्र ती अद्याप मिळालेली नाही. आज पुन्हा झालेल्या अपघातानंतर रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी