नीलम गोऱ्हे देखील अशोक खरातकडे भविष्य पाहायला जायच्या; तृप्ती देसाईं
पुणे, 30 मार्च (हिं.स.) : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना (शिंदे गट)चे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणात ३९ आमदार खरातला भेटले हो
nilam Gore


पुणे, 30 मार्च (हिं.स.) : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना (शिंदे गट)चे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणात ३९ आमदार खरातला भेटले होते, मग केवळ आपलेच नाव का लक्ष्य केले जात आहे, असा सवाल उपस्थित केला होता.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषदेत आणखी एक मोठा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, या ३९ आमदारांमध्ये विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचाही समावेश होता.

गोऱ्हे या नाशिकमधील एका हॉटेलमध्ये अशोक खरात यांना भेटल्या होत्या, असा आरोप देसाई यांनी केला.

आमदारकी आणि मंत्रीपदाबाबत भविष्य जाणून घेण्यासाठी गोऱ्हे या खरातला भेटत असत, तसेच त्यांनी अनेक वेळा त्याच्या कार्यालयालाही भेट दिल्याचा दावा देसाई यांनी केला. नाशिकच्या कॉलेज रोडवरील त्या कार्यालयात काही महिलांवर अत्याचार झाल्याचेही आरोप असून, त्याच ठिकाणी गोऱ्हे गेल्याचा खळबळजनक खुलासा त्यांनी केला.

या आरोपांमुळे प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता असून, संबंधितांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी अधिक गतीने होण्याची मागणीही जोर धरत आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande