उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरीत पाणीटंचाई टाळण्यासाठी तातडीचे निर्देश
पुणे, 30 मार्च : उन्हाळा हंगाम जवळ येत असताना उपलब्ध जलसाठा, घटती भूजल पातळी आणि वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहरात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी महापौर रवि लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याचे
Ravi


पुणे, 30 मार्च : उन्हाळा हंगाम जवळ येत असताना उपलब्ध जलसाठा, घटती भूजल पातळी आणि वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहरात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी महापौर रवि लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

नागरिकांना नियमित, समतोल आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करणे ही महापालिकेची वैधानिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत, सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महापौरांनी प्रशासनाला ‘उन्हाळा पूर्व कृती आराखडा’ (Summer Action Plan) तयार करण्याच्या सूचना दिल्या असून, प्रत्येक विभागाला स्पष्ट जबाबदाऱ्या सोपविण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच धरणातील उपलब्ध पाणीसाठा, जलशुद्धीकरण केंद्रे आणि वितरण यंत्रणेचे सखोल परीक्षण करून योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

शहरातील मुख्य आणि उपजलवाहिन्यांमधील गळती तातडीने शोधून दुरुस्त करण्यासोबतच अनधिकृत नळजोडण्या आणि पाणीचोरीवर कडक कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. संभाव्य टंचाईग्रस्त भागांची यादी तयार करून आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी ठेवण्यास सांगितले आहे.

याशिवाय सार्वजनिक बोअरवेल, विहिरी आणि पूरक जलस्रोत कार्यान्वित ठेवण्याबरोबरच पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी सक्षम तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाणी बचत, पुनर्वापर आणि अपव्यय टाळण्यासाठी जनजागृती करण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande