
पुणे, 30 मार्च (हिं.स.) : पुण्यातील विविध भागांत सोमवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. हलक्या पावसाच्या शिडकाव्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळत वातावरणात गारवा निर्माण झाला.
औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगर या भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. तर शहरातील इतर भागांत ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू असल्याचे पाहायला मिळाले. सकाळपासूनच आकाश ढगाळलेले होते आणि दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
हवामान विभागाने यापूर्वीच मुंबई, ठाणे, पुणे तसेच कोकण भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार पुण्यातही पावसाची नोंद झाली.
या पावसामुळे तापमानात किंचित घट झाली असून नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्याच्या हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात दुपारनंतर मेघगर्जना, 30 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे, पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे.
1 एप्रिलपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.-----------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु