
नवी दिल्ली, ३० मार्च (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ मार्च २०२६ रोजी त्यांच्या गृहराज्य गुजरातच्या एक दिवसीय दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान ते अध्यात्म, उद्योग आणि पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. या दौऱ्यात पंतप्रधान एका सेमीकंडक्टर प्लांटचे आणि २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील.
पंतप्रधानांच्या दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता गांधीनगरमधील कोबा तीर्थ येथून होईल, जिथे ते महावीर जयंतीनिमित्त 'सम्राट संप्रती संग्रहालया'चे उद्घाटन करतील. हे संग्रहालय जैन धर्माचे महान संरक्षक सम्राट संप्रती यांना समर्पित आहे. सात दालनांमध्ये पसरलेल्या या संग्रहालयात २,००० हून अधिक दुर्मिळ कलाकृती, प्राचीन हस्तलिखिते आणि दगडी व धातूच्या मूर्ती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, हे संग्रहालय जैन धर्माच्या विकासाचा प्रवास सादर करेल.त्यानंतर पंतप्रधान दुपारी १२:४५ वाजता अहमदाबादमधील सानंद जीआयडीसी येथे पोहोचतील, जिथे ते कीएन्स सेमीकॉन प्लांटचे उद्घाटन करतील. मायक्रॉननंतर, भारतात व्यावसायिक उत्पादन सुरू करणारा हा दुसरा सेमीकंडक्टर युनिट असेल. येथे ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये वापरले जाणारे ॲडव्हान्स्ड इंटेलिजेंट पॉवर मॉड्यूल्स (IPMs) तयार केले जातील. याची उत्पादन क्षमता दररोज ६.३३ दशलक्ष युनिट्सपर्यंत असेल.
पंतप्रधान २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणीही करतील. यामध्ये वीज, रेल्वे, रस्ते वाहतूक, आरोग्य, शहरी विकास, आदिवासी आणि ग्रामीण विकासाशी संबंधित योजनांचा समावेश आहे. अहमदाबाद-धोलेरा द्रुतगती मार्गाचेही उद्घाटन केले जाईल, तर गांधीनगर-कोबा-विमानतळ रस्त्यावरील नवीन उड्डाणपुलांची पायाभरणी केली जाईल. सौर ऊर्जा पारेषण प्रणालीचे (खावडा पूलिंग स्टेशन) लोकार्पणही केले जाईल, जे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
रेल्वे क्षेत्रात, कानलास-जामनगर आणि राजकोट-कानलास रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण राष्ट्राला समर्पित केले जाईल. याव्यतिरिक्त, नवीन खेडब्रह्मा-हिम्मतनगर-आसरवा रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला जाईल. बनासकांठा आणि पाटण जिल्ह्यांमध्ये पाइपलाइन प्रकल्पांचे उद्घाटन केले जाईल, ज्यामुळे लाखो लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल.
याव्यतिरिक्त, राणी की वाव आणि शर्मिष्ठा तलावावर लाईट अँड साऊंड शोचे उद्घाटन केले जाईल. शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी रात्र निवारा केंद्रांचेही उद्घाटन केले जाईल.
पंतप्रधान अहमदाबादच्या वेजलपूर येथे एका वसतिगृहाचे उद्घाटन करतील, ज्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी उत्तम सुविधा मिळतील. या दौऱ्यामुळे गुजरातच्या औद्योगिक विकासाबरोबरच त्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक पायाही मजबूत होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे