
नाशिक, 31 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नाशिक येथे राज्यस्तरीय फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद
आयोजित केल्याची माहिती राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे आणि राज्य प्रधान सचिव डॉ ठकसेन गोराणे यांनी दिली आहे. नाशिक येथील भोंदू खरात बुवाचे प्रकरण उघडकीस आले असून त्या बुवाने केलेले आर्थिक,मानसिक आणि लैंगिक शोषण चव्हाट्यावर आल्याने बुवाबाजीचे भीषण वास्तव अधोरेखित झाले आहे.शोषणाचे मोठे रॅकेट उघडकीस येत आहे.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गेल्या ३६ वर्षात हजारो बुवाबाबांचा पर्दाफाश केलेले आहे.संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळेच जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत काही भोंदूंना शिक्षा झाली आहे.यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे भोंदूबुवा आहेत. नाशिक येथील खुटवड नगरमधील सिटू भवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही परिषद होईल.
या परिषदेचे उद्घाटन खासदार वर्षाताई गायकवाड यांच्याहस्ते होणार आहे.या परिषदेत प्राचार्य डॉ नितीन शिंदे,सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त बाबासाहेब बुधवंत,मानसोपचार तज्ज्ञ डॉ जयंत ढाके, कॉ डी. एल. कराड, ॲड. रंजना गवांदे, दादा चांदणे,महा अंनिस चे राज्य अध्यक्ष माधव बावगे,महा अंनिस चे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे मार्गदर्शन करणार आहेत.
परिषदेच्या समारोपप्रसंगी लोकप्रबोधनपर रॅलीचे आयोजन केलेले आहे. सदर रॅली हुतात्मा स्मारक येथून निघून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करेल. तेथे परिषदेचा समारोप ज्येष्ठ साहित्यिक,संपादक व महाराष्ट्र अंनिसचे राज्य उपाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या भाषणाने होईल.
परिषदेत काही संकल्प आणि निर्धार केले जाणार आहेत.या परिषदेचे नियोजन डॉ. ठकसेन गोराणे ,विनायक सावळे, कृष्णा चांदगुडे,प्रा आशा लांडगे, अरुण घोडेराव,सुरेश बोरसे,राजेंद्र फेगडे आदी करीत आहेत. परिषदेसाठी राज्यभरातून तीनशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV