धारासूरमध्ये मंदिरावर वीज कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली
परभणी, 31 मार्च (हिं.स.) : गंगाखेड तालुक्यातील धारासूर गावात सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसादरम्यान श्रीराम मंदिरावर वीज कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. धारासूर येथील श्रीराम मंदिरात पोथी व पारायणा
धारासूरमध्ये मंदिरावर वीज कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली


परभणी, 31 मार्च (हिं.स.) : गंगाखेड तालुक्यातील धारासूर गावात सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसादरम्यान श्रीराम मंदिरावर वीज कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

धारासूर येथील श्रीराम मंदिरात पोथी व पारायणाच्या निमित्ताने काही महिला व पुरुष उपस्थित होते. दरम्यान, अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. संभाव्य धोका लक्षात घेऊन मंदिरात जमलेले ग्रामस्थ तत्काळ आपल्या घरी परतले.

ग्रामस्थ निघून गेल्यानंतर काही वेळातच मंदिरावर वीज कोसळली. या घटनेत मंदिराच्या वरच्या भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने त्या वेळी मंदिर परिसरात कोणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या घटनेमुळे धारासूर गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande