
नाशिक, 31 मार्च (हिं.स.)। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विद्रोहामुळेच राज्यात सत्ता परिवर्तन झाले, असा टोला लगावत शिवसेना (शिंदे गट) गटनेते अजय बोरस्ते यांनी अंदाजपत्रकीय महासभेत भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. प्रभाग विकास निधी ३१४ कोटींवर नेल्याबद्दल स्थायी समिती सभापतींचे अभिनंदन करतानाच बोरस्ते यांनी निधी वाटपातील असमानतेवर टीका केली.
काही सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागांना जास्त निधी देण्यात आला आहे. हा दुजाभाव योग्य नाही. निधी 'अ, ब, क, ड' असा न देता प्रत्येक प्रभागाला समान द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांच्या माध्यमातून शहरासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला, तसेच माजी पालकमंत्री दादा भुसे यांच्या काळात जिल्हा नियोजनातून मोठा निधी मिळाला होता. मात्र सध्याच्या अंदाजपत्रकात निधी वाटपात भेदभाव होत असल्याचे त्यांनी नमूद केले. महापालिकेच्या 'स्थिर ठेव' संदर्भातही त्यांनी प्रश्न उपस्थित करत प्रशासकीय काळात १०५ कोटी रुपयांची तूट दाखवण्यात आल्याचा उल्लेख केला आणि या रकमेचा हिशोब देत चौकशी करण्याची मागणी केली. यासोबतच शहरातील निवासी जागा व्यावसायिक वापरासाठी वापरल्या जात असल्याचे निदर्शनास आणून देत अशा मिळकतींवर व्यावसायिक कर आकारणी करून मनपाचे उत्पन्न वाढवावे, अशी सूचना त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV