
रायगड, 04 मार्च (हिं.स.) । देश कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण व्हावा आणि आयातीवरील अवलंबित्व कमी व्हावे, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सन २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीसाठी ‘कडधान्य आत्मनिर्भरता अभियान’ जाहीर केले आहे. या अभियानाअंतर्गत काढणीपश्चात प्रक्रिया युनिट (Processing Unit) घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
राज्यात रब्बी हंगाम २०२५-२६ पासून या अभियानाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तूर, उडीद व मसूर या प्रमुख कडधान्य पिकांवर विशेष भर देण्यात येणार असून काढणीनंतरची प्रक्रिया सुलभ व सक्षम करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. कडधान्य पिकांचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.सन २०२६-२७ या वर्षात काढणीपश्चात प्रक्रिया युनिट स्थापन करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. या घटकासाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था (FPOs), क्लस्टर स्तर महासंघ (CLFs), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) तसेच महाराष्ट्रातील विविध कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत संस्था पात्र राहतील.
प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल २५ लाख रुपये प्रति युनिट, यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे.अंमलबजावणीबाबत कृषी विभागाकडून वेळोवेळी निर्गमित सूचनांचे पालन करणे आवश्यक असून अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके