
कोल्हापूर, 04 मार्च (हिं.स.)। संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथील पुनर्बांधणी व नुतनीकरण कामाची आज सकाळी महापौर रुपाराणी निकम यांनी आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, गटनेते सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर रुपाराणी निकम म्हणाल्या की, कोल्हापूर शहरासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या या नाट्यगृहाला ८ ऑगस्ट २०२४ रोजी लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले होते. या दुर्दैवी घटनेनंतर नाट्यगृहाचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प महानगरपालिकेने हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील कामे उत्तमरीत्या पूर्ण झाली असून उर्वरित टप्प्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या नाटयगृहाची उर्वरीत सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी सन २०२४-२५ अंतर्गत रु. २५.१० कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत रु. १२.५५ कोटी निधी प्राप्त झाला असून उर्वरित निधीसाठी मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडे मागणी करण्यात आलेली आहे.
या कामाच्या पहिल्या टप्यामध्ये संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदान नुतनीकरण, जतन, संवर्धन व पुनर्बांधणीचे काम होते. सदरचे काम लक्ष्मीहेरिकॉन प्रा. लि., मुंबई यांचे नांवे मंजूर असून यामध्ये ग्राऊटींग, भिंतींचा गिलावा, छताच्या ट्रस व गर्डर निर्मिती, कमकुवत भिंतींचे पुनर्बांधकाम आदी कामे पूर्ण झाली आहेत. दुस-या टप्यामध्ये ग्रीन रूम व अनुषंगिक स्थापत्य कामे असून ठेकेदार व्ही. के. पाटील कॉन्ट्रॅक्टर्स अँड इंजिनिअर्स यांच्यावतीने दरवाजे, खिडक्या बसविणे, व्ही.आय.पी. रूम व ग्रीन रूम बांधकाम पूर्ण झाले असून बाल्कनी व कलादालन जिन्यांची कामे सुरू आहेत. सदरची कामे प्रगती पथवर असून ८० टक्के पूर्ण झाले आहे. तीस-या टप्यामधील इंटेरिअर, अॅकॉस्टिक, विद्युतीकरण व वातानुकूलन यंत्रणांची काम मंजूर असून ठेकेदार गोदरेज अँड बॉयस एमएफजी. कं. प्रा. लि., यांच्यामार्फत स्टेज, बाल्कनी, ए.सी. यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा, पॅनलिंग, स्वच्छतागृहे आदी कामे एकाचवेळी सुरू आहेत. सदरची कामे ६५ टक्के पूर्ण झाली आहेत. चौथ्या टयामध्ये स्टेज विद्युतीकरण, ड्रेपरी, ऑडिओ-व्हिडिओ प्रणाली, खुर्च्या व बैठक व्यवस्थेचे काम मंजूर आहे. यामध्ये स्टेज लाईटिंग, ऑडिओ सिस्टीम, कार्पेट व बैठक व्यवस्थेचे नमुने रंगकर्मींसमोर सादर करून अंतिम करण्यात आले असून काम सुरू आहे.
याशिवाय खासबाग कुस्ती मैदानाच्या दगडी तटबंदीची दुरुस्ती, प्रवेशद्वाराचे जतन व मजबुतीकरण, नाट्यगृहातील आधुनिक ध्वनी-प्रक्षेपण व्यवस्था, स्टेज लाईटिंग, नवीन पार्किंग इमारत, अंतर्गत रस्ते व परिसरातील पायाभूत सुविधा उभारणीसाठी रु.३५ कोटी निधीची मागणी दि.२५ फेब्रुवारी २०२६ रोजी नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे. त्याचाही पाठपुरावा प्रशासनाच्या वतीने सुरु आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar