
अमरावती, 04 मार्च (हिं.स.)जिल्ह्यातील दुर्गम असणाऱ्या धारणी येथे ह्युमन मिल्क बँक आणि अमरावतीमध्ये आयटी पार्क स्थापन करण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे खासदार डॉ. अनिल बोंडे आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी उपवनसंरक्षक अर्जुना के. आर., निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, उपजिल्हाधिकारी महसूल विवेक जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार उपस्थित होते.
खासदार डॉ. बोंडे यांनी जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा केली. यात प्रामुख्याने मेळघाटातील कुपोषण निर्मूलनासाठी धारणी येथे 'ह्युमन मिल्क बँक' स्थापित करण्यात यावी. या योजनेची उपयोगिता मेळघाटात सर्वाधिक आहे. डफरीन येथील ह्युमन मिल्क बँकेचे उत्तम परिणाम मिळत आहे. त्याच धर्तीवर ह्युमन मिल्क बँक कार्यान्वित करताना तपासणी, साठवणूक, स्वच्छता घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात यावे.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वन विभागाच्या जमिनीवर 'वड उद्यान' निर्माण करण्यात यावे. शहरात आयटी क्षेत्राला चालना देण्यासाठी एमआयडीसीमध्ये जागा आरक्षित करण्यात यावी. आयटी पार्कच्या विस्तारासाठी सलग जागेची आवश्यकता आहे. यासाठी संबंधितांना जागेची पाहणी करण्याबाबत कळविण्यात यावे. मोर्शी शहरातील वाढते अतिक्रमण आणि येरला येथील 1998-99 मधील घरकुल पट्टे वाटपाचा प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावा. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि बँकांच्या सीएसआर निधीचा प्रभावी उपयोग करण्यात यावा. यासाठी सर्व संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधी, तसेच प्रशासनासोबत समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले. सीएसआर फंडसाठी बॅंक, कंपन्यांनी आवश्यक सामाजिक विषय प्राधान्याने घेण्यात यावा. आरोग्य, जिल्हा परिषदेच्या शाळा, डिजिटल शिक्षण, पर्यावरण यासारख्या घटकांवर निधीचा विनियोग करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.याव्यतिरिक्त, अमरावती महानगरपालिका क्षेत्रात चिल्ड्रन्स पार्क व ग्लो गार्डन उभारण्यासाठी अंदाजे 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच संगीता भिसे यांच्या पाल्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. धारणे येथे आदिवासी मुलांसाठी खेलो इंडियासाठी क्षेत्र विकसित करण्यासाठी जागेची पाहणी करावी. तसेच चिखलदऱ्याप्रमाणे चांगले गार्डन, चिल्ड्रन पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश धारणी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी