अमरावतीत स्थायी समिती सभापतिपदासाठी ६ मार्चला निवडणूक
अमरावती, ४ मार्च (हिं.स.) । अमरावती महानगरपालिकाच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी येत्या ६ मार्च रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. १६ सदस्यीय समितीच्या या महत्त्वाच्या पदासाठी महायुतीतून कोणत्या पक्षाला संधी दिली जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्
स्थायीच्या सभापतिपदासाठी महायुतीत चढाओढ तिजोरीच्या चाव्या भाजप की राष्ट्रवादीकडे, शनिवारी निर्णय


अमरावती, ४ मार्च (हिं.स.) । अमरावती महानगरपालिकाच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी येत्या ६ मार्च रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. १६ सदस्यीय समितीच्या या महत्त्वाच्या पदासाठी महायुतीतून कोणत्या पक्षाला संधी दिली जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

तब्बल 4 वर्षांनंतर महापालिकेचे सभागृह अस्तित्वात आल्यानंतर या पंचवार्षिक कार्यकाळातील पहिली स्थायी समिती गठित झाली आहे. आर्थिक व्यवहारांसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या समितीच्या १६ सदस्यांची निवड झाल्यानंतर आता सभापतिपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

समितीचे संख्याबळएकूण

१६ सदस्यांमध्ये भाजपचे ५, काँग्रेसचे ३, युवा स्वाभिमानचे ३, राष्ट्रवादी काँग्रेसचे २, एमआयएमचे २ आणि शिवसेना (शिंदे गट)चा १ सदस्य असा समावेश आहे. भाजपप्रणीत महायुतीकडे एकूण ११ सदस्यांचे बहुमत असून विरोधकांकडे ५ सदस्य आहेत. सभापतिपदासाठी ९ मतांची आवश्यकता असल्याने महायुतीचे पारडे जड मानले जात आहे.

महायुतीतील समझोत्याप्रमाणे महापौरपद भाजपकडे, तर उपमहापौरपद युवा स्वाभिमानकडे देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाला अद्याप कोणतेही पद देण्यात आलेले नाही. त्यामुळे ‘नैसर्गिक न्याय’ तत्वानुसार सभापतिपद राष्ट्रवादीकडे जाईल, अशी चर्चा आहे. मात्र पहिले सभापतिपद भाजप स्वतःकडेच ठेवणार असल्याचेही बोलले जात असून अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

मार्डीकर आणि बांबल यांची नावे चर्चेत

सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अविनाश मार्डीकर आणि भाजपचे मिलिंद बांबल यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती आहे. मिलिंद बांबल यांनी यापूर्वीही हे पद भूषविले आहे. भाजपकडे पाच सदस्य असल्याने त्यांचा दावा मजबूत मानला जातो. मात्र नवीन चेहऱ्यालाही संधी देण्याचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडे केवळ दोन सदस्य असले तरी अविनाश मार्डीकर यांचा अनुभव लक्षात घेता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. शनिवारी (ता. ६) सकाळी ९ ते १०.३० या वेळेत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजता स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात निवडणुकीची पुढील प्रक्रिया पार पडणार आहे.

१६ सदस्य मतदान करणार असून, बहुमताच्या जोरावर सभापतीपद कोणाच्या वाट्याला येणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande