
सोलापूर, 04 मार्च (हिं.स.)ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणने थकबाकीदारांच्या विरोधात ऑटो डिस्कनेक्शन मोहीम सुरू केली आहे. यामुळे थकीत वीजबिल भरायला विलंब करणाऱ्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा स्मार्ट मीटरच्या माध्यमातून रिमोट पद्धतीने खंडित केला जात आहे. यामध्ये आजअखेर 192 थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार, रिमोट ऑपरेशन मोहीम राज्यभरात यामध्ये सांगोला तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर अंमलात आणण्यात आली आहे.
स्मार्ट मीटर बसविलेल्या ग्राहकांनी थकबाकीची रक्कम निश्चित कालावधीत भरली नाही. तर, संगणक प्रणालीद्वारे वीज जोडणी बंद केली जात आहे.दरम्यान, सांगोला अंतर्गत 28 हजार स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. तर हातीद अंतर्गत 19 हजार वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. तालुक्यातील दोन सबस्टेशन अंतर्गत 47 हजार वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहे. महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार स्मार्ट मीटर बसवण्याचे 78 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू असून, स्मार्ट मीटर बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड