
रायगड, 04 मार्च (हिं.स.)। मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात “न्याय आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत फिरती लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
आगामी ३० मार्च २०२६ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात ही फिरती लोक अदालत कार्यरत राहणार असून विविध तालुक्यांमध्ये जाऊन प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा केला जाणार आहे. तसेच नागरिकांना विविध कायद्यांबाबत मार्गदर्शन, मोफत सल्ला व न्याय सहाय्य देण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना जलद, सुलभ आणि विनामूल्य न्याय सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. फिरत्या लोक अदालतीसाठी निवृत्त न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये यांची कक्ष न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत लोक अदालत भरविण्यात येणार असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजेंद्र सावंत यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके