
पुणे, 04 मार्च (हिं.स.)।
पुणे महापालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षांचा बहुचर्चित अर्थसंकल्प येत्या सोमवारी (9 मार्च) सादर केला जाणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर करणार असून हा अर्थसंकल्प किती कोटींचा असेल तसेच यामध्ये कशावर भर असणार आहे? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
महापालिकेत गेले चार वर्षापासून असलेले प्रशासकराज संपुष्टात येऊन नवीन सभागृह अस्तित्वात आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला स्थायी समितीसमोर अंदाजित अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे. आयुक्तांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पाचा अभ्यास करुन त्यामध्ये इतर तरतुदींचा समावेश करुन स्थायी समिती अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी ठेवून त्याला अंतिम मंजुरी घेईल. त्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरु केली जाईल.
महापालिकेचे सभागृह अस्तित्वात आल्यानंतर महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांची निवड झाली. मात्र महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात असलेल्या स्थायी समितीची निवडणूक न झाल्याने अर्थसंकल्प सादर करण्यासाठी काही दिवस विलंब झाला. गेल्या महिन्यात स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची निवड झाली असून स्थायी समितीच्या दोन बैठका देखील झाल्या आहेत. त्यामुळे आयुक्त नवल किशोर राम २०२६-२७ वर्षासाठीचा अर्थसंकल्प कधी सादर करणार, याबाबत उत्सुकता होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु