
लातूर, 04 मार्च (हिं.स.)।
लातूर शहरातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने दिनांक ०३ मार्च २०२६ रोजी विवेकानंद चौक पोलीस ठाणे हद्दीत मटका जुगार चालत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर पथकाने तत्काळ छापा टाकून दोन जणांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.
पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गरूड चौक येथे काही इसम ‘कल्याण’ नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित आहेत. सदर माहितीची खात्री करून पोलीस पथकाने सायंकाळी ४.०० वाजता अचानक छापा टाकला. छाप्यामध्ये दोन इसम मटका जुगार चालविताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली.
१) विजय व्यंकट परगे, वय ३१ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. महादेव नगर, लातूर.
२)समीर इब्राहीम सय्यद, वय २८ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. आंबेडकर चौक, लातूर
त्यांची झडती घेतली असता आरोपींकडून मटका जुगाराचे साहित्य, आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या, रोख रक्कम तसेच २ मोबाईल फोन असा एकूण २९,६९० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये विवेकानंद चौक पोलीस ठाणे, लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक अयुब शेख, सफौ उत्तम जाधव, पोलीस अंमलदार युसुफ शेख, रामहरी भोसले, दिपक वैष्णव,संजय बेरळीकर (पो.स्टे. विवेकानंद चौक, लातूर) यांचा समावेश होता.
शहरातील अवैध धंद्यांविरोधात पुढील काळातही अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्यात येणार आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis