
सोलापूर, 04 मार्च (हिं.स.)।
सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी सत्ताधारी भाजपमध्ये सध्या जोरदार लॉबिंग सुरू असून ‘कुबेराची खुर्ची’ नेमकी कोणाच्या ताब्यात जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सभापतिपद हे लिंगायत समाजाला देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपमध्ये नगरसेवक अविनाश पाटील आणि नगरसेविका रंजिता चाकोते यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. दोघांपैकी एकाची उमेदवारी अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत मिळत असून अंतिम निर्णयासाठी पक्षश्रेष्ठींकडे हालचाली वेगाने सुरू आहेत.स्थायी समिती सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयात दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे आज दुपारपर्यंत सभापतिपदाचा अधिकृत चेहरा स्पष्ट होणार आहे. स्थायी समिती सभापती निवडीवरून सत्ताधारी भाजपात राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. सत्ताधारी गटामध्ये अंतर्गत चर्चांचे सत्र सुरू असून अंतिम क्षणापर्यंत नाव जाहीर न करण्याची रणनीती भाजपकडून अवलंबली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड