
लातूर, 05 मार्च (हिं.स.)। लातूर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या तीन कनिष्ठ अभियंत्यांनी पदोन्नतीसाठी बनावट प्रमाणपत्र देऊन पदोन्नती मिळून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात लातूरच्या #शिवाजीनगर #पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. या विभागात मोठ्या प्रमाणात अनेकांना पदोन्नती देण्यात आली, बहुतांशी पदोन्नती या शंकेच्या भोवऱ्यात सापडलेल्या आहेत. पदोन्नतीसाठी एकतर डिप्लोमा करावा लागतो किंवा परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते तसे न करता अनेक अभियंत्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून पदोन्नती मिळवली आहे. या पदोन्नती मिळविण्याच्या प्रकारामध्ये जिल्हा परिषदेतील तत्कालीन इतरही अधिकारी सहभागी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मिना यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घातले तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असणारे कनिष्ठ अभियंता स्वामी एन एस (पंचायत समिती देवणी) बी. एस. सूर्यवंशी कनिष्ठ अभियंता तसेच श्रीमती बी.पी. पाटील (कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग जि.प.लातूर) हे तीन कनिष्ठ अभियंते चौकशीमध्ये दोषी आढळल्याने त्यांचे विरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलिसात खोटे प्रमाणपत्र बनवून पदोन्नतीचा लाभ घेतला व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपकार्यकारी अभियंता प्रदीप बालाजी देवशेटवार यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत पदोन्नती घ्यायची असेल तर विशिष्ट डिप्लोमा अथवा परीक्षा पास होणे आवश्यक असते, पण या विभागातील बहुतेकांनी बनावट कागदपत्र तयार करून पदोन्नती घेतली आहे अशी शंका आहे. काल शिवाजीनगर पोलिसात केवळ तीन कनिष्ठ अभियंत्याचे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप आणखी सात ते आठ जण या चौकशीच्या भोवऱ्यात आहेत, त्यांच्या पदोन्नती संदर्भात शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यापैकी काहींची प्रकरणे न्यायप्रविष्ठ असल्याने तसेच काहींच्या बाबतीत स्पष्टपणे त्यांनी दाखल केलेली कागदपत्र बनावट की खरी याचा खुलासा न झाल्याने त्यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र ज्या ज्या कर्मचाऱ्यांना अशी पदोन्नती देण्यात आली आहे त्या सर्वांचीच चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जिल्हा परिषद क्षेत्रातुन होत आहे. कनिष्ठ अभियंता स्वामी एन एस, कनिष्ठ अभियंता बी एस सूर्यवंशी व कनिष्ठ अभियंता श्रीमती पी.पी. पाटील यांच्या विरोधात शासनाची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिवाय इतर अभियंत्यांच्या संदर्भात चौकशी चालू आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी या प्रकरणात निपक्षपातीपणे चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कठोर भूमिका पार पाडली आहे. जि. प.च्या सार्वजनिक बांधकाम विभागात आणखी काही अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे देऊन पदोन्नती मिळवली आहे त्यांचीही तात्काळ चौकशी करण्यात यावी व त्यांची विरोधात देखील गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी होत आहे. बनावट प्रमाणपत्र देऊन पदोन्नती मिळविण्याचे प्रकार हे जि. प.च्या प्रशासकीय काळात झाले आहेत आता जिल्हा परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी आले आहेत त्यांनी बनावट पदोन्नती संदर्भात चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. बनावट कागदपत्र मिळवून शासनाची फसवणूक करणाऱ्या अशा या अधिकाऱ्यांना कायमचे घरी बसवावे अशी जनतेतून मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis