नाशकात १२ तारखेपासून पाच दिवसीय कृषी कुंभ
शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी शासनाचा उपक्रम नाशिक, 05 मार्च, (हिं.स.) : जिल्ह्याच्या कृषी वैभवाला आधुनिकतेची जोड देत शेतकऱ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, आत्मा आणि माविम या
Five-day Krishi Kumbh to be


शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी शासनाचा उपक्रम

नाशिक, 05 मार्च, (हिं.स.) : जिल्ह्याच्या कृषी वैभवाला आधुनिकतेची जोड देत शेतकऱ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, आत्मा आणि माविम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषीकुंभ-२०२६’ नाशिक जिल्हा कृषी महोत्सव व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कृषी कुंभ गुरुवार दि. १२ ते सोमवार दि. १६ मार्च या कालावधीत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.

सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत युथ फेस्टिव्हल मैदान, बळी मंदिर चौक, पार्कसाईटजवळ कृषी कुंभ भरविण्यात येणार असून सर्वांसाठी प्रवेश मोफत असणार आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी गावागावांतून १,३८७ बसचे नियोजन करण्यात आले आहे.

शेतीविषयक नवीन उत्पादन पद्धती, अत्याधुनिक तंत्रज्ञान, एआय आणि ड्रोनचे थेट प्रात्यक्षिक यामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेतीबाबत जागरूकता निर्माण होणार आहे. केवळ चर्चांपुरते मर्यादित न राहता कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एआय तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच शेतीची कामे सुलभ करणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाचे लाईव्ह डेमोही पाहायला मिळणार आहेत.

कृषीकुंभ-२०२६ मध्ये नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांची ‘खाऊ गल्ली’ हे विशेष आकर्षण असणार आहे. विविध खाद्यपदार्थांचे सुमारे ६५ स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. तसेच थेट शेतकऱ्यांकडून दर्जेदार धान्य खरेदीसाठी ‘धान्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा आणि शेतकऱ्यांची धावपळ टळावी, यासाठी प्रदर्शनस्थळी थेट अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कृषी पतपुरवठा, यांत्रिकीकरण आणि काढणीनंतरच्या तंत्रज्ञानाबाबत बँकांचे प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत. या कृषी कुंभाचा लाभ नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande