
रायगड, 06 मार्च (हिं.स.) – वडखळ पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने दागिने आणि रोख रक्कम अशी तब्बल ६ लाख ९७ हजार ५०० रुपयांची चोरी केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलीसांच्या माहितीनुसार, ही घटना ३ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास मौजे मोठे वढाव, पो. वढाव, ता. पेण येथे घडली. फिर्यादी त्यांच्या कुटुंबासह गावातील हरिनाम सप्ताह कार्यक्रमात गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
चोरट्याने किचनमधील कपाटाचा लॉक तोडून त्यामधील दागिने व रोख रक्कम चोरून नेली. ही घरफोडी लक्षात येताच फिर्यादींनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
वडखळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक १८/२०२६ नोंदवण्यात आला असून, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता 2023 कलम ३३१ (२), ३३१ (४) आणि ३०५(अ) अन्वये कारवाई सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव करीत आहेत.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके