पुष्पक एक्सप्रेसमधून सराईत महिला चोर जेरबंद
Nashik Road Railway Police action; Sarait woman arrested from Pushpak Express
पुष्पक एक्सप्रेसमधून सराईत महिला चोर जेरबंद


नाशिक, 06 मार्च (हिं.स.)। नाशिकरोड रेल्वेतून प्रवासकरणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या एका सराईत महिलेला नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. तिच्याकडून ७५ हजार ९९९ रुपये किमतीचे ४ महागडे मोबाईल जप्त करण्यात आले असून, न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, दि. ४ मार्च रोजी नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्याचे पथक फलाटावर गस्त घालत होते. यादरम्यान अऊन 'पुष्पक एक्सप्रेस'च्या मागील जनरल कोचमध्ये एक महिला संशयास्पदरीत्या वावरताना सहाय्यक उपनिरीक्षक संतोष उफाडे पाटील यांना दिसून आली. पोलिसांनी तिला नाव आणि प्रवासाचे कारण विचारले असता, तिने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. संशय बळावल्याने आरपीएफ आरक्षक सागर वर्मा आणि कृष्णा यादव यांच्या मदतीने तिला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. महिला पोलीस हवालदार चेतना शिरसाठ यांनी तिची अंगझडती घेतली असता, तिच्याकडे सॅमसंग, ओप्पो, रेडमी अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे चार

मोबाईल सापडले. पोलिसी खाक्या दाखवताच तिने तिचे नाव सुनिता साजेश भोसले (४५, रा. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती) असल्याचे सांगितले. हे मोबाईल तिने इगतपुरी ते नाशिकरोड दरम्यान प्रवाशांच्या बॅगेतून चोरल्याची कबुली दिली.

या मोबाईलपैकी सॅमसंग कंपनीचा पर्पल रंगाचा मोबाईल मिराबाई निवृत्ती सातपुते (५०, रा. खोडे नगर, वडाळागाव) यांचा होता. त्यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित महिलेला रेल्वे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला १४ दिवसांची कोठडी सुनावल्याने तिची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

लोहमार्ग छत्रपती संभाजी नगर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, डीवायएसपी वसंत भोये, प्रभारी अधिकारी सचिन बनकर, आरपीएफ इन्स्पेक्टर नवीन प्रतापसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील, आरक्षक सागर वर्मा, के. के. यादव, राज बच्छाव, शैलेंद्र पाटील आणि हवालदार चेतना शिरसाठ यांनी ही यशस्वी कारवाई केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande