पत्नीच्या मित्रावर पतीचा कोयत्याने जीवघेणा हल्ला
Husband fatally attacks wife's friend with a sickle who came to visit her
पत्नीच्या मित्रावर पतीचा कोयत्याने जीवघेणा हल्ला


नाशिक, 06 मार्च (हिं.स.) : पत्नीला भेटायला आलेल्या मित्रावर पतीने रागाच्याभरात त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना गोदाघाटावरील दुतोंड्या मारूती परिसरात घडली. या हल्ल्यात कमल बैरवा (वय २६, रा. रताल्या, जि. जयपूर, रा. राजस्थान) हा युवक जखमी झाला असून त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. ४ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास फिर्यादी कमल बैरवा हे मैत्रीणीला भेटण्यासाठी गोदाघाटावरील दुतोंड्या मारूतीजवळ आले होते. त्यावेळी आरोपी राकेश खंडेराव जाधव हा तेथे आला आणि माझ्या पत्नीशी फोनवर का बोलतो, असे म्हणत त्याला मारहाण करू लागला. संतापलेल्या पतीने बैरवा यांना तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत त्याच्याजवळील कोयता बैरवा यांच्या डोक्यात मारला. तो बैरवा यांनी चूकवला आणि ते पळू लागले. काही अंतरावर ते जमिनीवर पडले असता राकेश जाधवने पुन्हा बैरवा यांच्या पाठीवर कोयत्याने चार ते पाच वार करून त्यांना गंभीर जखमी केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कमल व बरोबर असलेल्या महिलेने मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे नागरिक घटनास्थळी जमा होऊ लागले. लोकांचा जमाव जमू लागल्याचे पाहताच हल्लेखोर राकेश जाधव तेथून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले. याप्रकरणी कमल बैरवा यांच्या फिर्यादीवरुन पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande