
राजस्थानी माठांमुळे स्थानिक कारागिरांसमोर आव्हान
रायगड, 06 मार्च (हिं.स.) :उन्हाळ्याच्या वाढत्या झळांमुळे नागरिक त्रस्त झाले असून तहान भागवण्यासाठी थंड पाण्याची गरज अधिक भासत आहे. महागड्या फ्रिजच्या तुलनेत मातीच्या माठातील नैसर्गिक थंड पाणी पिण्याकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पारंपरिक माठांना पुन्हा एकदा मोठी मागणी निर्माण झाली आहे. विजेशिवाय किंवा कोणत्याही इंधनाशिवाय पाणी गार ठेवण्याची क्षमता असलेला मातीचा माठ ‘गरिबांचा फ्रिज’ म्हणून ओळखला जातो.
उन्हाळ्याची चाहूल लागताच घराघरांत माठांचा वापर सुरू होतो. काहीजण मागील वर्षीचा माठ स्वच्छ करून वापरतात, तर काहीजण नव्याने माठ खरेदी करण्यासाठी कुंभारवाड्याकडे वळतात. मातीच्या माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड आणि शीतल असल्याने ते आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. त्यामुळे आधुनिक युगातही माठांचे महत्त्व कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.मात्र गेल्या काही वर्षांपासून बाजारात राजस्थानमध्ये तयार होणाऱ्या माठांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश केला आहे. हे माठ तुलनेने स्वस्त असून त्यामध्ये नळाची सुविधा असल्याने ग्राहकांना ते अधिक सोयीस्कर वाटतात. फेरीवाले हे माठ थेट गावोगावी आणि घराघरांत पोहोचवत असल्याने त्यांची विक्री झपाट्याने होत आहे.याचा परिणाम स्थानिक कुंभार कारागिरांच्या व्यवसायावर होत आहे. स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या माठांची किंमत आकारानुसार २०० ते ५०० रुपयांपर्यंत असते, तर राजस्थानी माठ २०० ते ३०० रुपयांत नळासह उपलब्ध होत असल्याने ग्राहक त्याकडे अधिक वळत आहेत. त्यामुळे पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या माती कारागिरांच्या पारंपरिक व्यवसायासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही राजस्थानमधील लाल मातीचे माठ ग्रामीण भागात दाखल झाले असून स्थानिक कारागिरांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम जाणवत आहे.----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके