
रत्नागिरी, 6 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि कला विश्वाची वाढती गरज लक्षात घेऊन आणि स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरीत एक सुसज्ज ‘मिनी थिएटर’ (Mini Theatre) उभारण्यात आले आहे. या मिनी थिएटरचे उद्घाटन शनिवारी, ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
अरिहंत मॉल येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रात हे थेटर उभारण्यात आले आहे. श्री. सामंत यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
या मिनी थिएटरची एकूण आसन क्षमता ३०० असून लघु नाट्यछटा, कार्यक्रम, स्नेहसंमेलने यांसारख्या कार्यक्रमांसाठी हे मिनी थिएटर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याला कला व संस्कृतीची दीर्घ परंपरा लाभलेली आहे. त्याला अधिक मोठे स्वरूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे या मिनी थिएटरच्या उद्घाटन कार्यक्रमात स्थानिक रत्नागिरीकर, कलाकार, रंगकर्मींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी