
अमरावती, 06 मार्च (हिं.स.)
भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना यावेळी राज्यसभेसाठी भाजपची उमेदवारी नक्कीच मिळेल, अशी खात्री त्यांच्या समर्थकांना होती. पण, त्यांचा अपेक्षाभंग झाला. नवनीत राणा यांना संधी नाकारण्यात आली. त्यानंतर समाजमाध्यमांवर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना संघर्ष आपल्यासाठी नवीन नसल्याचे सांगितले होते. आज पुन्हा एकदा त्या समाजमाध्यमावर व्यक्त झाल्या आहेत. त्यात त्यांनी ‘निष्ठेने पुढे चला, प्रत्येक गोष्ट शक्य आहे’, असा आशावाद व्यक्त केला आहे.
राज्यसभेची संधी नाकारण्यात आल्यानंतर राणा समर्थक चांगलेच निराश झाले. नवनीत राणा यांनी अद्याप उघडपणे सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त केली नसली, तरी समाज माध्यमांवरील त्यांच्या संदेशातून लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे शल्य कायम असल्याचे ध्वनित होत आहे.
आज समाजमाध्यमांवर हिंदी भाषेतून त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. “हर बितता वक्त तुम्हे यह याद दिला रहा है, अगर तुम कामयाब नही हुए, तो कोई तुम्हारा नही होता”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. नवनीत राणा म्हणतात, ‘सरणारा प्रत्येक क्षण तुला हीच आठवण करून देत आहे, की जर तू यशस्वी झाला नाहीस, तर कोणीही तुझे नसते. तरीही मेहनत करा, निष्ठेने पुढे चला, प्रत्येक गोष्ट शक्य आहे.
राज्यसभेसाठी उमेदवारी उमेदवारी न मिळाल्याने भावनिक झालेल्या नवनीत राणांनी संघर्ष ही माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही, मी कुठल्याही वळणावरून नवीन सुरूवात करू शकते, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
नवनीत राणा २०१९ मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. पण, लगेच त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा देत, काँग्रेसची साथ सोडली. काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का होता. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.जिल्ह्यातील भाजप नेते, कार्यकर्ते यांच्यासह महायुतीच्या नेत्यांचा विरोध असतानाही त्यांचा पक्षप्रवेश झाला. त्यांना उमेदवारी दिली गेली. पण काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी त्यांचा पराभव केला. हा राणा समर्थकांसाठी फार मोठा धक्का होता. यानंतर नवनीत राणा यांना राज्यसभेची संधी नक्कीच मिळेल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती. पण, नेहमी ‘धक्कातंत्रा’चा वापर करणाऱ्या भाजपने नवनीत राणा यांना यावेळी संधी नाकारली आणि राणा समर्थकांना दुसरा धक्का बसला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी