
अमरावती, 07 मार्च (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यात ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्था अधिक शाश्वत आणि मजबूत करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत ८ ते २२ मार्च या कालावधीत ‘जल महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी सांगितले की, या कालावधीत जिल्ह्यातील गावांमध्ये विविध जनजागृतीपर तसेच कृतीप्रधान उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यांनी नमूद केले की, पाणी केवळ पायाभूत सुविधा नाही, तर ती सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारी देखील आहे; त्यामुळे पाण्याचे संवर्धन आणि योग्य वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. जल महोत्सवाच्या निमित्ताने गावांमध्ये पाणी समित्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जाणार असून, प्रशिक्षित महिलांच्या साहाय्याने फिल्ड टेस्टिंग किटद्वारे पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी केली जाईल. याशिवाय, जल स्रोतांचे संरक्षण व पुनरुज्जीवन, स्वच्छता मोहीम, पाणीपुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतरण, सांडपाणी व्यवस्थापन, तसेच सामुदायिक जल शपथ यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
योजना पूर्ण झालेल्या गावांमध्ये ‘जल अर्पण दिवस’ साजरा करण्यात येणार असून, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, युवक मंडळे व बचत गटांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी