
अमरावती, 07 मार्च (हिं.स.) अमरावती येथे मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा कडाका वाढला असून कमाल तापमान थेट ४१ अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. मागील सात दिवसांत तापमानात तब्बल ५ अंशांची वाढ झाली असून शुक्रवारी (दि.६) यंदातील आतापर्यंतचे सर्वोच्च ४०.८ अंश तापमान नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे शुक्रवारी राज्यातील सर्वाधिक तापमान अमरावतीत नोंदले गेले. सध्या उष्ण व कोरडे वातावरण तसेच निरभ्र आकाश यामुळे तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. साधारणपणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तापमान ४२ अंशांच्या आसपास पोहोचते; मात्र यंदा पहिल्याच आठवड्यात तापमान ४१ अंशांच्या जवळ पोहोचल्याने नागरिकांना एप्रिलसारख्या उन्हाच्या झळा जाणवत आहेत. २७ फेब्रुवारीला कमाल तापमान ३५.८ अंश होते. त्यानंतर दररोज सरासरी सुमारे ०.८ अंशाने वाढ होत २ मार्चला ३८.२ अंश, ५ मार्चला ३९.८ अंश आणि शुक्रवारी ४०.८ अंशांपर्यंत पारा पोहोचला. वाढत्या तापमानामुळे उन्हाळी पिके घेणारे शेतकरी चिंतेत असून नागरिकांनाही दुपारच्या सुमारास उष्णतेचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील चार दिवस तापमान याच पातळीवर राहण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी