पूर्वप्रेयसीला धमकी देत ५ लाखांची खंडणी मागितली; लग्न मोडल्याचा आरोप
अमरावती, ७ मार्च (हिं.स.) : परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने पूर्वप्रेयसीला बदनामीची धमकी देत ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच दोघांमधील वैयक्तिक फोटो आणि चॅटिंगचे स्क्रीनशॉट तिच्या होणाऱ्या पतीला पाठव
पूर्वप्रेयसीला धमकी देत ५ लाखांची खंडणी मागितली; लग्न मोडल्याचा आरोप


अमरावती, ७ मार्च (हिं.स.) : परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने पूर्वप्रेयसीला बदनामीची धमकी देत ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच दोघांमधील वैयक्तिक फोटो आणि चॅटिंगचे स्क्रीनशॉट तिच्या होणाऱ्या पतीला पाठवून जुळलेले लग्न मोडल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणी नागेश प्रभाकर बावस्कार (वय ३१) याच्याविरुद्ध विनयभंग, खंडणी मागणे आणि बदनामीची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती परतवाडा पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत युवती आणि संशयित नागेश बावस्कार यांच्यात सुमारे पाच वर्षे प्रेमसंबंध होते. या काळात दोघांनी एकत्र फिरताना काही वैयक्तिक फोटो काढले होते तसेच मोबाईलवर चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलही केले होते. त्याचे स्क्रीनशॉट संशयिताकडे असल्याचे सांगितले जाते.

१९ फेब्रुवारी २०२६ पासून संशयिताने पिडीत युवतीला सतत कॉल व संदेश पाठवून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच १ मार्च रोजी युवतीच्या महिला नातेवाईकाच्या मोबाईल क्रमांकावरही संपर्क साधून युवतीशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी युवतीकडे शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

युवतीने त्याला नकार दिल्यानंतर गावात बदनामी करण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, युवतीचे नातेवाईकांनी तिचे लग्न दुसऱ्या युवकासोबत ठरवले होते. ही माहिती मिळाल्यानंतर संशयिताने पूर्वीचे वैयक्तिक फोटो व चॅटिंगचे स्क्रीनशॉट युवतीच्या होणाऱ्या पतीला पाठविले. त्यामुळे ठरलेले लग्न मोडल्याचा आरोप पिडीतेने केला आहे.

या घटनेमुळे पिडीत युवतीची मानसिक स्थिती बिघडल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारीच्या आधारे नागेश प्रभाकर बावस्कार याच्याविरुद्ध परतवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande