
अमरावती, ७ मार्च : राज्य शासनाने महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत तसेच अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे. मात्र, आता ही सवलत मिळवण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) असणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे हे कार्ड नसेल, त्यांना एसटी प्रवासातील सवलतींचा लाभ मिळणार नाही.
आतापर्यंत ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक हे आधार कार्ड दाखवून सवलतीचा लाभ घेत होते. मात्र, पुढे आधार कार्ड दाखवून सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक आधार कार्डांवर जन्मतारखांची नोंद चुकीची असल्यामुळे वयाची पडताळणी करताना अडचणी येत होत्या. काही प्रवाशांचे प्रत्यक्ष वय कमी वाटत असतानाही आधार कार्डावर ६० ते ६५ वर्षांवरील वय नोंद असल्यामुळे त्यांना सवलत द्यावी लागत होती.
या पार्श्वभूमीवर आता एनसीएमसी कार्डची व्यवस्था लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व बस स्थानकांवर प्रवाशांची नोंदणी सुरू करण्यात आली असून अमरावतीत आतापर्यंत सुमारे ९ हजार प्रवाशांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या प्रवाशांना एका महिन्याच्या आत एनसीएमसी कार्ड उपलब्ध होणार आहे.
हे कार्ड महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असले तरी सर्वसामान्य प्रवाशांनाही ते मिळवता येणार आहे. या कार्डमध्ये दरमहा ५०० ते १ हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम टॉप-अप करण्याची सुविधा राहणार आहे. त्यामुळे एखाद्या वेळी प्रवासी घरी पैसे विसरले किंवा चिल्लर नसल्यास या कार्डच्या माध्यमातून वाहकाला भाडे देता येणार आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी